समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका ; दोन ठार, दोन गंभीर जखमी

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. वाशिम जिल्ह्यातील कारंजा जवळील चॅनल क्रमांक 213 च्या परिसरात काल उशिरा रात्री झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगरवरून नागपूरकडे टमाट्यांचा माल घेऊन जाणारी बोलेरो (क्र. MH 44 U 1883) आणि छत्तीसगडकडे जाणारा आयशर ट्रक (क्र. CG 08 AV 0575) यांच्यात जोरदार धडक झाली. भरधाव वेगात असलेल्या ट्रकने बोलेरोला मागून धडक दिल्याने बोलेरो समोर चालणाऱ्या दुसऱ्या ट्रकच्या (क्र. CG 07 CH 7755) मागील टायरमध्ये घुसली. अपघात इतका भयानक होता की बोलेरो वाहन चेंगराचेंगरीत फसून गेले.
या भीषण धडकेत बोलेरोमधील चालक व क्लिनर यांचा जागीच मृत्यू झाला. तर आयशर ट्रकमधील दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बातमी लिहीपर्यंत मृतक व जखमींची नावे समजू शकली नाहीत.
समृद्धी महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने अपघात होत असल्याची बाब गंभीर ठरत आहे. वेगमर्यादा न पाळणे, थकवा, निष्काळजी वाहनचालक, तसेच सिग्नल व सुरक्षा यंत्रणांचा अभाव हे घटक वारंवार समोर येत आहेत. प्रशासनाने तातडीने योग्य ती पावले उचलून या महामार्गावरील सुरक्षितता वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दोन जणांचा मृत्यू आणि दोन गंभीर जखमींसह झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.