
LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
रिसोड शहरात दिनांक २९ सप्टेंबर रोजी आदिवासी समाजाच्यावतीने विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले. धनगर, वंजारी तसेच बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करू नये तसेच त्यांना आरक्षण लागू करू नये, या मागणीसाठी हजारो आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. महिला, युवक, वयोवृद्ध आणि लहान मुले पारंपरिक पोशाखांत सहभागी झाल्याने मोर्चाने लक्ष वेधले. घोषणाबाजीने रिसोड शहर दणाणून गेले.
नगरपरिषद चौकातून निघालेला हा मोर्चा सिव्हिल लाईन मार्गे तहसील कार्यालयावर धडकला. येथे तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले की, बंजारा, धनगर व वंजारी समाज अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी करत असलेली चळवळ असंविधानिक आहे. सन १९५० च्या हैद्राबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये कुठेही उल्लेख नाही, तर १९५२ च्या गॅझेटनुसार ते ओबीसीमध्ये समाविष्ट असल्याचे स्पष्ट केले आहे. अशा परिस्थितीत नव्याने कोणत्याही समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करू नये, असे स्पष्ट मत आदिवासी समाजाने नोंदवले.
निवेदनात असेही म्हटले आहे की, धनगर, बंजारा व वंजारी समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम असून त्यांना अनुसूचित जमातीचे आरक्षण दिल्यास खऱ्या मागास आदिवासींचे नुकसान होईल. त्यामुळे शासनाने ही मागणी मंजूर केल्यास आदिवासी समाजामध्ये असंतोष निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी इशाराही देण्यात आला.
या मोर्च्यात माजी आमदार संतोष टारफे, माजी जि.प. सदस्य सतीश पाचपुते, महादेव डाखोरे, बाबाराव गोदमले, अविनाश पंधरे, आनंदराव पवार यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चाचे आयोजन आदिवासी युवक कल्याण संघ घोंसर व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्या वतीने करण्यात आले होते.