क्राईमविदर्भ

खेर्ड्यात अवैध धंद्यांचे साम्राज्य ; नागरिक त्रस्त, पोलिस प्रशासनाचे मौन

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

वाशिम जिल्ह्यातील कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील खेर्डा परिसरात अवैध धंद्यांचे जाळे दिवसेंदिवस फोफावत चालले आहे. शहराच्या अगदी हाकेच्या अंतरावर आणि अकोला–अमरावतीला जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत बेकायदेशीर व्यावसायिकांनी खुलेआम आपले बस्तान बसवले आहे. या अवैध धंद्यामुळे समाजातील अनेक कुटुंबांची वाताहात होत असून संसार उद्ध्वस्त होत आहेत.

गावच्या गल्लीपासून ते महामार्गाच्या कडेला, दारू, जुगार, सट्टा आणि इतर अवैध धंद्यांचे अड्डे निर्भयपणे सुरू आहेत. स्थानिक युवक या भुरट्या धंद्यांमध्ये गुरफटत चालले असून त्याचा थेट परिणाम त्यांच्या भविष्यावर व कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर होत आहे. काहींनी घरदार विकले, काहींनी शेती गहाण ठेवली तर काहींचे संसार उध्वस्त झाले. पण प्रशासन मात्र कानावर हात ठेवून गप्प बसल्याचे चित्र दिसत आहे.

कर्तव्यदक्षतेचा दावा करणारे कारंजा ग्रामीण पोलीस यंत्रणा याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे का, असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. कारण अवैध धंद्यांची माहिती सामान्य नागरिकांनाही सहज मिळते, तर मग पोलीसांना ती कशी मिळत नाही? ही थेट जनतेच्या डोळ्यात धूळफेक आहे, असा सूर लोकांमध्ये उमटतोय.

खेर्डा परिसरातील नागरिकांच्या तोंडी एकच मागणी आहे – पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करून अवैध धंदे हद्दपार करावेत. अन्यथा जनतेलाच रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, अशी चर्चा जोर धरत आहे. पोलीस विभागाने गंभीरतेने लक्ष देऊन कारवाई केली नाही तर या परिसरात कायद्याच्या अंमलबजावणीबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होणार हे निश्चित.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही