महाराष्ट्रसामाजिक

कामगारांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेफिकीर कंपन्यांविरोधात सांगलीत धरणे आंदोलन ; परवाना रद्द व दोषींना अटक करण्याची रिपाईची मागणी

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे

कामगारांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंपन्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) सांगली जिल्ह्याच्या वतीने आज मंगळवार दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, सांगली येथे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.

बेडग ता. मिरज येथील वाळकृष्ण बिल्डिंग फार्म कंपनी व नंदा ग्रुपकडून कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. कंपनीकडून निष्काळजी व बेजबाबदार वृत्ती दाखवली जात असून, यामुळे कामगारांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. यापूर्वीही या कंपन्यांच्या कारभारावर अनेक वादग्रस्त आरोप झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या कामकाजाची सखोल चौकशी करून कंपनीचा परवाना रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली.

आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न हा केवळ कायदेशीर नियमांचा नाही, तर थेट जीवन-मरणाशी संबंधित आहे. कामगारांना सुरक्षा साधनं, विमा व मूलभूत सुविधा न देता असुरक्षित परिस्थितीत काम करून घेतले जात असल्याने वारंवार अपघात घडत आहेत. त्यामुळे जबाबदारांवर फौजदारी कारवाई करून दोषींना अटक करावी, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली. या धरणे आंदोलनाला अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून पाठींबा दिला. त्यांच्या समर्थनामुळे या लढ्याला अधिक बळ मिळाले असून, प्रशासनावर तातडीने कारवाई करण्यासाठी दबाव वाढला आहे.

कामगारांच्या सुरक्षिततेकडे सतत दुर्लक्ष करणाऱ्या कंपन्यांविरोधात ठोस कारवाई होणे आवश्यक असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. अन्यथा, आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)च्या नेत्यांनी दिला.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही