महापालिकेत काळाकुट्ट कारभार ; वर्क ऑर्डरची लपवाछपवी ; अधिकारी-राजकारण्यांची गुप्त साटेलोटेगिरी उघड

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
प्रतिनिधी | श्रीकांत यमगर
राजकीय दबाव आणि अधिकाऱ्यांची बेजबाबदार कारभारशाही यामुळे सांगली महापालिका पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. संजय नगर प्रभाग क्रमांक 11 मध्ये जनतेच्या जाहीर विरोधाला न जुमानता मुतारीचे काम सुरू करण्यात आले असून, याबाबत आयुक्तांनाच कोणतीही माहिती नसल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.
प्रशासक प्रमुखांच्या आदेशाचा धाक दाखवत शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, आरोग्य अधिकारी आणि उपायुक्त यांनी कोणतीही पाहणी न करता या कामाचे वर्क ऑर्डर काढल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. स्थानिक नागरिकांच्या घरामध्ये आधीच नाले व गटारांमधून पाणी शिरण्याची गंभीर समस्या असताना, या जागेवर मुतारी उभारल्यास संपूर्ण परिसरात आरोग्य व स्वच्छतेचे मोठे संकट निर्माण होणार आहे. शिवाय, या मुतारीचा वापर दारुड्यांसह अवैध धंदे करणाऱ्यांकडून होईल, असा थेट आरोप स्थानिक संघटनांनी केला आहे.
याप्रकरणी “आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटना, महाराष्ट्र राज्य” चे प्रभारी मिलिंद विष्णू साबळे यांनी आयुक्तांकडे लेखी निवेदन देऊन तातडीने काम थांबवावे आणि मुतारी दुसरीकडे हलवावी, अशी मागणी केली आहे. ज्यांनी पाहणी केलीच नाही, जनतेची मते जाणून घेतली नाहीत, अशा अधिकाऱ्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. चुकीची माहिती देऊन प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई व्हावी, अशी भूमिका संघटनेने स्पष्ट केली.
आयुक्त साहेबांनी स्वतः घटनास्थळ पाहणी करून न्याय द्यावा, अन्यथा पुढील चार-पाच दिवसांत जनतेचा मोर्चा महापालिकेवर काढण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. सांगलीत जनतेच्या हक्कासाठी लढणाऱ्या संघटनांनी आता आरपारची लढाई छेडली असून, राजकीय दबावाखाली घेतलेले निर्णय उघडकीस आणण्याची हाक दिली आहे.