शासकीय सेवेत सेवाभावाने कार्य करून प्रशासनाचा चेहरा उजळवा ; पालकमंत्री दत्तात्रय भरणे

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
शासकीय सेवेत रुजू होताना नागरिकाभिमुख, जबाबदार आणि कार्यक्षमतेने काम करून प्रशासनात मौल्यान्वित योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी केले. शासनाची सेवा ही केवळ नोकरी नसून समाजसेवेचे माध्यम आहे. पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि तत्परतेने काम केल्यास नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत सुधारित अनुकंपा नियुक्ती व लिपिक-टंकलेखक भरतीचा जिल्हास्तरीय रोजगार मेळावा जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे उत्साहात पार पडला. यामध्ये अनुकंपा तत्वावर ४९ तर एमपीएससीतून निवड झालेल्या ४८ उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, शासनाच्या सुधारित धोरणामुळे प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना वेगाने नियुक्ती मिळत आहे. आता सर्व विभागांची माहिती एकत्र करून उमेदवारांना पसंतीनुसार नियुक्ती दिली जात आहे.
जिल्हा परिषदेचे सीईओ अर्पित चौहान यांनी ४० उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली असून पुढील काही दिवसांत आणखी काहींना संधी दिली जाईल, असे सांगितले. पोलिस अधीक्षक अनुज तारे यांनी नवीन उमेदवारांना शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि जनसेवेचे भान ठेवून काम करण्याचा सल्ला दिला. तर आमदार श्याम खोडे यांनी अनुकंपा नियुक्तीला कुटुंबासाठी दिलासा देणारा निर्णय ठरल्याचे सांगत उमेदवारांना कुटुंबाचा आधार बनण्याचे आवाहन केले.
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमाचा थेट प्रक्षेपण वाशिम येथे दाखविण्यात आला. राज्यभरात १०,३०९ उमेदवारांना एकाचवेळी नियुक्तीपत्रे देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन शाहू भगत यांनी केले तर आभार निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी मानले.