खटाव सीमेवर चोरट्यांचा थैमान ; घोरपडे वस्तीवर मध्यरात्री हल्ला ; दाम्पत्यावर चाकू-काठ्यांचे वार

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे
मिरज | खटाव गावात, कर्नाटक सीमेवरील घोरपडे वस्तीवर चोरट्यांनी मध्यरात्री अक्षरशः धुमाकूळ घातला. बुधवारी रात्री साडेबारा ते एकच्या सुमारास पाच ते आठ चोरट्यांनी महादेव रामचंद्र घोरपडे यांच्या घरावर दरोडा टाकत महादेव घोरपडे व त्यांची पत्नी सुमन घोरपडे यांच्यावर चाकू व काठ्यांनी अमानुष मारहाण केली. या घटनेत चोरट्यांनी दीड तोळे सोनं व सुमारे २५ हजार रुपयांचा मोबाईल लंपास केला.
दरवाजा ठोठावल्यावर महादेव घोरपडे यांनी दरवाजा उघडताच चोरट्यांनी कपाळावर व डोक्याच्या पाठीमागे चाकूने वार केला. तसेच मांडी, पोट व हातावर काठ्यांचे फटके बसल्याने त्यांचा हात फ्रॅक्चर झाला. सुमन घोरपडे यांनाही बेदम मारहाण करत कानातील सोन्याचे दागिने ओढून घेतल्याने कान फाटले असून, गळ्यातील मंगळसूत्रही चोरट्यांनी हिसकावून नेले.
दोघांचा आरडाओरडा ऐकून शेजारील भावकीचे लोक मदतीला धावल्याने चोरटे घाईघाईने पळून गेले. सुदैवाने प्रचंड मारहाण होऊनही दोघेही जीवंत बचावले आहेत.
३१ डिसेंबरच्या मध्यरात्री, नववर्षाच्या सुरुवातीलाच घडलेल्या या जबरी चोरीमुळे खटाव व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद साहेब, डीवायएसपी भागवत साहेब (सांगली विभाग), सांगली क्राईम ब्रँचचे प्रमुख पीआय संजीव झाडे यांच्यासह अधिकारी, एपीआय सुनील गुरव (डीबी पथक), फॉरेन्सिक पथक व श्वान पथकाने रात्रीच घटनास्थळी तपास केला.
खटाव हे कर्नाटक सीमेवरील गाव असल्याने सीमेवर चोरीचे प्रकार वारंवार घडत असून, चोरटे चोरी करून कर्नाटक हद्दीत पसार होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गावात काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असले, तरी गावाबाहेरील मळ्यांच्या भागात कॅमेरे नसल्याचा फायदा चोरटे घेत असल्याचे चित्र आहे.
सीमा भागातील वाढते चोरीचे प्रकार पोलीस यंत्रणेसाठी डोकेदुखी ठरत असून, चोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी सीमावर्ती रस्त्यांवर तसेच शेतकरी व नागरिकांनी आपल्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची गरज आता प्रकर्षाने समोर आली आहे.