
LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
मंगरुळपीर तालुक्यासह संपूर्ण राज्यातील शेतकरी सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. त्याला उभारी देण्यासाठी कर्जमाफी हा एकमेव उपाय आहे अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच शेखर भगत यांनी प्रशासनाकडे केली आहे.
राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टी, पुर आणि पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी कोसळला आहे. दरम्यान, विधानसभेच्या काळात तत्कालीन व विद्यमान सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र एक वर्ष उलटूनही या आश्वासनावर सरकारकडून ठोस निर्णय झालेला नाही, याकडे शेखर भगत यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
शेतकऱ्यांना आज नैसर्गिक आपत्ती, वाढलेली खतांची किंमत, अवकाळी पाऊस, आणि हमीभावांपेक्षा कमी दर या साऱ्या संकटांनी घेरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक उभारी देण्यासाठी प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची मदत देणे, पंचनामे जलदगतीने पूर्ण करून नुकसान भरपाई वितरित करणे, तसेच कर्जमाफी जाहीर करणे अत्यावश्यक आहे, अशी मागणी त्यांनी केली.
मागील तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांना वारंवार पुराचा फटका बसल्याने त्यांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने एकत्रितपणे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची थेट मदत द्यावी, अशी मागणी शेखर भगत यांनी केली.
मंगरुळपीर तालुक्यातही सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाले आहे. शासनाने केवळ घोषणा नव्हे, तर प्रत्यक्ष मदत करावी; अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत, असा इशाराही शेखर भगत यांनी दिला.