
LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
शासनाने भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ मध्ये रूपांतरण करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमूल्य रक्कमेत सवलत जाहीर केली आहे. महसूल व वन विभागाच्या ४ मार्च २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार ही विशेष सवलत लागू राहणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.
सवलतीचे मुख्य मुद्दे :
कृषी जमिनींसाठी :
नगरपंचायत, नगरपरिषद किंवा नियोजन प्राधिकरण हद्दीबाहेरील कृषी जमिनींच्या रूपांतरणासाठी शेतीदराच्या २५ टक्के रक्कम आकारली जाणार. ३१ डिसेंबरनंतर हीच रक्कम ७५ टक्के होईल.
अकृषिक विभागातील जमिनींसाठी :
बिनशेती विभागात येणाऱ्या जमिनींसाठी ५० टक्के अधिमूल्य, तर ३१ डिसेंबरनंतर ७५ टक्के* आकारणी.
नगरपंचायत/नगरपरिषद क्षेत्रातील कृषी जमिनींसाठी :
बिनशेती विभागाबाहेरील जमिनींसाठी २५ टक्के, बिनशेती विभागातील जमिनींसाठी ५० टक्के अधिमूल्य. ३१ डिसेंबरनंतर अनुक्रमे ७५ टक्के आकारणी होईल.
रहिवासी, वाणिज्यिक व औद्योगिक वापरासाठी :
रहिवासी जमिनींसाठी (कब्जेहक्काने) १५% अधिमूल्य, नंतर ६०% रहिवासी जमिनी (भाडेपट्ट्याने)२५%, नंतर ७५% , वाणिज्यिक/औद्योगिक जमिनींसाठी ५०%, नंतर ६०% सदर तरतुदी सिलिंग कायद्यानुसार वाटप झालेल्या जमिनींसाठी लागू होणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अर्ज प्रक्रिया :
इच्छुकांनी तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा. अर्जासोबत जमीन दस्तऐवज, नकाशा, वर्ग-२ प्रमाणपत्र व अधिमूल्य रक्कम भरण्याचा पुरावा जोडावा. महसूल व वनविभागाची ४ मार्च २०२५ रोजीची अधिसूचना संग्रही ठेवावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
शासनाने वर्ग–२ जमिनीचे वर्ग–१ रूपांतरणासाठी जाहीर केलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे अनेकांना कायमस्वरूपी मालकीहक्क मिळणार असून नागरिकांनी ३१ डिसेंबरपूर्वी अर्ज सादर करून या सवलतीचा लाभ घ्यावा.
योगेश कुंभेजकर, जिल्हाधिकारी वाशिम