शिवरायांना अनोखी मानवंदना ; महाराष्ट्रात अमृतचा विश्वविक्रमी दुर्गोत्सव

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
महाराष्ट्राच्या अभिमानाचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-दुर्गांचा सन्मान आणि गौरव जगभर पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेने या दीपावलीत ‘दुर्गोत्सव २०२५’ या भव्य उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाद्वारे अमृतने विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा संकल्प केला आहे.
शिवछत्रपतींच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेले महाराष्ट्रातील १२ ऐतिहासिक दुर्ग युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट झाले असून, त्याचा अभिमान साजरा करण्याचा अनोखा मार्ग अमृतने शोधला आहे.
दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत बालकंपनी मातीचे किल्ले बनवून शिवरायांच्या कार्याचे स्मरण करत असते. या परंपरेलाच जागतिक पातळीवर नेण्यासाठी अमृततर्फे नागरिकांना आपल्या घरच्या अंगणात, बाल्कनीत किंवा सोसायटीच्या जागेत १२ दुर्गांपैकी कोणत्याही एका दुर्गाची किमान दोन फुटांची प्रतिकृती तयार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सहभागी नागरिकांनी तयार केलेल्या गड-दुर्गासोबत सेल्फी काढून [www.durgotsav.com](http://www.durgotsav.com) या संकेतस्थळावर अपलोड करायचा आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे अभिनंदनपत्र पाठवले जाणार आहे.
याशिवाय सहभागी नागरिकांना ‘अमृत विद्या’ या डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेले ९९९ रुपयांचे प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे. या कोर्समध्ये शिवरायांचा गौरवशाली इतिहास, स्वराज्यरक्षक दुर्ग, कवी भूषणांची कवने, स्वराज्ययोद्ध्यांची चरित्रे आदींचा समावेश आहे.
१२ गड-दुर्गांपैकी एक निवडावा :
रायगड, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, साल्हेरदुर्ग, खांदेरीचा दुर्ग, जिंजी, पन्हाळगड, शिवनेरी, विजयदुर्ग, लोहगड, पद्मदुर्ग (सुवर्णदुर्ग).
या उपक्रमाचे अनावरण शिवश्रुष्टी हिस्टोरिकल थीम पार्क, पुणे येथे अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या हस्ते झाले. या वेळी विशेष कार्यकारी अधिकारी श्रीराम बेंडे, प्रवीण पांडे, सिद्धेश्वर वरणगावकर व राज्य व्यवस्थापक दीपक जोशी उपस्थित होते.
या प्रसंगी विजय जोशी म्हणाले की, शिवरायांचे स्वराज्य हे गड-दुर्गांच्या किल्लेदार बळावर उभे राहिले. आज घराघरात गड-दुर्गांच्या प्रतिकृती साकारून आपणही त्या वारशाला मानवंदना देऊया.