महाराष्ट्र

गटारीवर मुतारी बांधकामाचा प्रकार ; आयुक्तांवर चौकशीची मागणी

आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार व मीडिया संघटनेची मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदनाद्वारे विनंती

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे

सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ११, संजय नगर परिसरात शासनाच्या जीआरचा भंग करून गटारीवर मुतारी बांधकाम सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले असून, संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रभारी मिलिंद विष्णू साबळे सर यांनी निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या नियमांनुसार कोणत्याही गटारीवर बांधकाम करणे किंवा ती बंदिस्त करणे मान्य नाही. तरीदेखील सांगली महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी काही चुकीच्या व्यक्तींच्या दबावाखाली व आपल्या शहर अभियंता, नगर अभियंता यांच्या चुकीच्या माहितीवरून या ठिकाणी मुतारी बांधकामास मंजुरी दिली आहे.

संघटनेच्या मते, या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी न करता वर्क ऑर्डर मंजूर करण्यात आली असून, सदर कामात चार लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या चुकीमुळे यापूर्वी ३० लाख रुपयांचे शौचालय पाडण्यात आले होत, तरी ते दुरुस्त करण्याऐवजी पुन्हा नवीन मुतारी बांधकाम सुरू करण्यात आले आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, शासनाच्या नियमानुसार बगीचा क्षेत्रात स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय बांधले जाणे अपेक्षित असताना आयुक्त गांधी यांनी त्याचे पालन केले नाही. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने चौकशी करून, चुकीची माहिती देणारे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही संघटनेकडून करण्यात आली आहे.

या निवेदनाची प्रत नगर विकास मंत्री, राज्य सचिव, जिल्हा पालकमंत्री, पुणे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी सांगली यांनाही पाठविण्यात आली आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही