धक्कादायक | फलटणच्या महिला डॉक्टरचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रकार ; सुसाईड नोटमध्ये दोन पोलिसांवर अत्याचाराचे गंभीर आरोप

LiVE NEWS | UPDATE
सातारा | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
फलटण | साताऱ्यातील फलटण शहर हादरवणारी घटना घडली आहे. फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे (वय ३२) यांनी काल रात्री एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याने वैद्यकीय क्षेत्रात आणि पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेने फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्याच नव्हे, तर संपूर्ण सातारा जिल्ह्यातील वैद्यकीय वर्तुळाला धक्का बसला आहे. आत्महत्येनंतर समोर आलेल्या सुसाईड नोटमुळे मात्र या घटनेला थेट पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे नवे वळण मिळाले आहे.
सुसाईड नोटमध्ये दोन पोलिसांवर गंभीर आरोप
आत्महत्येपूर्वी डॉ. संपदा मुंडे यांनी स्वतःच्या हातावरच पेनाने सुसाईड नोट लिहिली, असे तपासात समोर आले आहे. या चिठ्ठीत त्यांनी दोन पोलिस अधिकाऱ्यांना आपल्या मृत्यूला जबाबदार धरले आहे. सुसाईड नोटमध्ये संपदा मुंडे यांनी स्पष्ट शब्दांत लिहिले आहे की, माझ्या मरणास पोलीस निरीक्षक गोपाल बदने जबाबदार आहे, ज्याने चार वेळा माझ्यावर अत्याचार केले. पोलीस प्रशांत बनकर याने मागील चार महिन्यांपासून माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला. या विधानाने संपूर्ण साताऱ्याच्या पोलीस यंत्रणेवर संशयाचे सावट निर्माण झाले आहे. सध्या पोलिसांनी दोन्ही अधिकाऱ्यांवर तपास सुरू केला असून या आरोपांमुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे.
वाद, तणाव आणि आत्महत्येचा धक्कादायक शेवट
सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून डॉ. मुंडे या पोलिस आणि आरोग्य विभागातील एका वादात अडकल्या होत्या. एका वैद्यकीय तपासणीच्या प्रकरणात पोलिस कर्मचाऱ्यांशी त्यांचा वाद झाल्यानंतर त्यांच्या विरोधात अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती.
या तणावातून डॉ. मुंडे मानसिकदृष्ट्या त्रस्त झाल्या होत्या, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, त्यांच्या सुसाईड नोटमधील गंभीर आरोपामुळे हा फक्त मानसिक तणावाचा प्रश्न नसून अत्याचार आणि छळाची कहाणी असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
साताऱ्याचे पोलीस दल हादरले ; कठोर कारवाईची मागणी
डॉ. मुंडे यांच्या मृत्यूनंतर साताऱ्यात वैद्यकीय आणि सामाजिक वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. “डॉक्टरवर अत्याचार करणाऱ्यांना तत्काळ अटक करा” अशी मागणी होत आहे.
पोलिस अधीक्षक कार्यालयाने या प्रकरणी तपास पथक नेमले असून दोन्ही आरोपी पोलिसांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या घटनेमुळे सातारा जिल्हा आणि फलटण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
पालकमंत्र्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश
घटनेच्या गांभीर्याची दखल घेत साताऱ्याचे पालकमंत्री यांनी तातडीने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल, कोणीही दडपशाही चालवू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.