राष्ट्रीय महामार्गावर ट्रकला अचानक आग ; पोलिस व अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
नांदेड–अकोला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 वर सोमवारी सायंकाळी एका चालत्या ट्रकला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे 7.30 वाजता अकोल्याहून हिंगोलीकडे जाणारा ट्रक (क्रमांक MH-18 BA 0554) समृद्धी महामार्गावरील पुलाजवळून जात असताना त्यात अचानक शॉर्टसर्किटमुळे ठिणगी उडाली. काही क्षणांतच ट्रकला आग लागली. हे लक्षात येताच ट्रकचालक अब्दुल हसीब (वय 45, रा. वाशिम) यांनी तत्काळ वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले आणि डायल 112 वर संपर्क साधला.
माहिती मिळताच मालेगाव पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल सत्यप्रकाश सुपारे, चालक कॉन्स्टेबल विलास पवार, महामार्ग सुरक्षा पथकातील हेड कॉन्स्टेबल सुधांशू पाचपिले, कॉन्स्टेबल अमोल कापडी तसेच एमएसएफचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मालेगाव नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाच्या मदतीने आग नियंत्रणात आणली.
आगीमुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी ट्रक बाजूला करून रस्ता पुन्हा सुरू केला. वेळीच मदत पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने ट्रकमध्ये कोणताही स्फोटक किंवा ज्वलनशील माल नसल्याने आग मोठ्या प्रमाणावर पसरली नाही. या घटनेत चालक सुरक्षित बचावला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
स्थानिक नागरिकांनी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या तात्काळ कारवाईचे कौतुक केले आहे. त्यांच्या तत्परतेमुळे एक मोठी दुर्घटना टळल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.