क्राईमविदर्भ

रिसोड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ; अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवणारा आरोपी अवघ्या ५ दिवसांत पंजाबमध्ये पकडला

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

रिसोड पोलिसांनी केवळ पाच दिवसांत अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत पंजाब राज्यातील लुधियाना येथून अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीस अटक केली आहे.

तक्रारदार वय ३४ वर्ष, रा. रिसोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी दि. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी अज्ञात व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेली होती. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.

प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्री. अनुज तारे (आय.पी.एस.), अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, व सहायक पोलीस अधीक्षक श्री. नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली, ठाणेदार श्री. रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने तांत्रिक साधनांचा वापर करून आरोपीचा माग काढला.

अखेरीस पथकाने विक्कु कुमार रघुवीर राम (वय १९, रा. रेबरा, जि. समस्तीपुर, बिहार) यास लुधियाना, पंजाब येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी अल्पवयीन मुलीची आरोपीच्या तावडीतून सुखरूप सुटका करून तिला नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

मुलीच्या पालकांनी पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानत भावना व्यक्त केल्या की, महाराष्ट्र पोलिसांमुळे आम्हालाही या राज्यात सुरक्षित वाटते.

ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण डोंगरे, संतोष आघाव, पोलीस अंमलदार समाधान वाघ, रवि इरतकर, महिला पोलीस अंमलदार कांचन डोंगरदिवे आणि रमेश इंगोले यांनी संयुक्तपणे पार पाडली.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही