आर्थिकमहाराष्ट्रसामाजिक

आरग शाखेला ५१ वर्षे पूर्ण ; आर्थिक साक्षरतेचा महत्त्वाचा संदेश

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे

मिरज | सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सांगलीच्या आरग शाखेचा ५१वा वर्धापन दिन शुक्रवारी (दि. २१ नोव्हेंबर २०२५) नव्या इमारतीत उत्साहात साजरा झाला. सकाळी १० वाजता शाखा व्यवस्थापक श्री. प्रकाश पाटील, तसेच श्री. लंगोटे साहेब, श्री. आर. एस. पाटील व सौ. शशिकला गावडे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला प्रारंभ झाला.

कार्यक्रमाची सुरुवात श्री महालक्ष्मी प्रतिमेच्या पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या वेळी आरग विराजमान सह. सोसायटीचे अध्यक्ष श्री. शामराव देसाई, उपाध्यक्ष सौ. उज्वला गुरव, सचिव श्री. सचिन गायकवाड, तज्ञ संचालक श्री. राजू सौदागर, तसेच शिंदेवाडी सोसायटीचे अध्यक्ष श्री. प्रविण साळुंखे व सचिव श्री. राहुल कांबळे उपस्थित होते. आरगचे माजी सरपंच श्री. तुकाराम पाटील व कवी श्रीशैल चौगुले यांनीही उपस्थिती लावली.

दुसऱ्या सत्रात ग्राहक व शेतकरी बांधवांसाठी “आर्थिक साक्षरता व डिजिटल सेवा मेळावा” घेण्यात आला. मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. देवराव लोकरे यांनी मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांनी शेतीसोबत जोडधंद्याची गरज अधोरेखित केली. बँक ऑफ इंडिया आर्थिक साक्षरता केंद्राचे श्री. दीपक क्षिरसागर यांनी विविध सरकारी योजनांची माहिती दिली.

यावेळी शाखा व्यवस्थापक प्रकाश पाटील यांनी २०२४–२५ या वर्षातील शाखेची कामगिरी सादर केली. आरग शाखेचा एकूण व्यवसाय २०० कोटी, ठेवी ८२ कोटी ७९ लाख, कर्जे २०२ कोटी ५२ लाख, सोनेतारण कर्जे २ कोटी १६ लाख, तर नफा ५ कोटी २६ लाख झाल्याची माहिती त्यांनी दिली. सामाजिक योजनांतील खात्यांची निर्मिती, एटीएम वापर, पासवर्ड गोपनीयता याबाबतही त्यांनी सूचना केल्या.

तिसऱ्या सत्रात ज्येष्ठ ठेवीदार श्री. बापूसो कोळी यांचा सत्कार तसेच नवनियुक्त सचिव श्री. सचिन शिवाजी गायकवाड यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचा समारोप श्री. अरमान मुजावर यांच्या आभारप्रदर्शनाने झाला.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही