
LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
वाशिम जिल्ह्यातील रिसोड, मंगरूळपीर, कारंजा नगरपरिषद तसेच मालेगाव नगरपंचायत निवडणुकांसाठी आज (२ डिसेंबर) झालेल्या मतदानाला मतदारांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला. सकाळी ७.३० वाजता मतदानास सुरुवात होताच विविध केंद्रांवर मतदारांची गर्दी उसळली. विशेषतः दिव्यांग मतदार, ज्येष्ठ नागरिक आणि प्रथमच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या नवमतदारांनी लोकशाहीच्या पर्वात उत्साहाने सहभाग जाहीर करत मतदान केंद्रांवर उपस्थिती लावली.
रिसोड शहरातील मतदानात एक वेगळाच प्रेरणादायी क्षण पाहायला मिळाला. तब्बल १०५ वर्षीय चंद्रभागा माळेकर यांनी मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीचे महत्व पुन्हा अधोरेखित केले. त्याचप्रमाणे मालेगाव नगरपंचायत निवडणुकीत १०३ वर्षीय सुबरावी गुलाम हुसेन यांनीही आपल्या उच्च वयोमानात उपस्थित राहून समाजास जागरूकतेचा संदेश दिला. या ज्येष्ठ मतदारांच्या सहभागामुळे मतदान केंद्रांवरच्या वातावरणात विशेष उत्साह पाहायला मिळाला.

दुपारी ३.३० वाजेपर्यंत एकूण ६९,१२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये
रिसोड नगरपरिषद : १५,६८४ (पुरुष – ७,६०४ / महिला – ८,०८०) – एकूण ५२.३५%
मंगरूळपीर नगरपरिषद : १३,३२५ (पुरुष – ६,७३५ / महिला – ६,५९०) – एकूण ४५.७६%
कारंजा नगरपरिषद : ३०,४७२ (पुरुष – १५,५१९ / महिला – १४,४४९ / इतर – ४) – एकूण ४३.३३%
मालेगाव नगरपंचायत : ९,६४७ (पुरुष – ४,७६९ / महिला – ४,८७८) – एकूण ५०.३३%
मतदान प्रक्रियेवर संपूर्ण दिवसभर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी वॉर रुमच्या माध्यमातून लक्ष ठेवले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधत मतदान प्रक्रिया पारदर्शक, शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी त्यांनी आवश्यक सूचना देत स्थितीवर नियंत्रण ठेवले.
यंदाच्या निवडणुकीत प्रशासनाने विशेष उपक्रम राबवले. प्रत्येक नगरपरिषदेमध्ये दिव्यांग अनुकूल मतदान केंद्रे, आदर्श मतदान केंद्र, तसेच पर्दानसिन महिला मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. केंद्रांवर पिण्याचे पाणी, दिवाबत्ती, दिव्यांगांसाठी रॅम्प, बसण्याची सोय, स्वच्छता सुविधा यांसह काही ठिकाणी सेल्फी पॉईंट आणि आकर्षक सजावट करून मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
मतदान प्रक्रियेचे निरीक्षण करण्यासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक अनिल खंडागळे यांनी आज मालेगावमधील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी मतदान केंद्रावरील सुविधा, सुरक्षा व्यवस्था, ईव्हीएमची स्थिती, क्यू व्यवस्थापन तसेच दिव्यांग मतदारांसाठी उपलब्ध केलेल्या सोयींची तपासणी केली. मतदान शांततेत आणि सुरळीत सुरू असल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची अप्रिय घटना घडली नसून मतदान पूर्णपणे शांततेत पार पडल्याची नोंद आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व मतदारांचे आभार मानले असून अंतिम मतदानाची अधिकृत आकडेवारी उशिरा जाहीर होण्याची शक्यता आहे.