मिरज पूर्व भागात पाणीटंचाई भीषण ; म्हैशाळ आवर्तन तातडीने सुरू करा ; भाजप किसान मोर्चाची मागणी

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे
मिरज | मिरज पूर्व भागात सध्या पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. बदलत्या हवामानामुळे फळबागा, पानमळे, ऊस यांसह प्रमुख पिकांना मोठा ताण जाणवत असून, भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने खालावली आहे. परिणामी शेतकऱ्यांना तसेच जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या गंभीर परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याने म्हैशाळ पाणी योजनेचे आवर्तन तातडीने सुरू करावे, अशी एकमुखी मागणी भाजप किसान मोर्चातर्फे करण्यात आली आहे.
या मागणीसंदर्भातील निवेदन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील, काकासाहेब धामणे यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाने मिरजचे आमदार व माजी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांना सादर केले. मिरज पूर्व भागातील तलावांमध्ये पाणी सोडल्यास पाणीटंचाईत मोठा दिलासा मिळेल आणि शेतीसह जनजीवन सुरळीत राहण्यास मदत होईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
या प्रसंगी सलगरेचे उपसरपंच रमेश चाळके, भाजप मिरज मंडल तालुकाध्यक्ष अभिजित गौराजे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. वाढत्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेताना नेत्यांनी स्पष्ट केले की, सध्या पिकांना जीवदान देण्यासाठी ‘म्हैशाळ’चे आवर्तन हा सर्वात तातडीचा उपाय असून त्यासाठी प्रशासनाने विलंब न करता सकारात्मक निर्णय घ्यावा.
भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील म्हणाले की, म्हैशाळ योजनेचे आवर्तन सुरू झाल्यास पिकांचे होत असलेले नुकसान मोठ्या प्रमाणात टळेल. शेतकऱ्यांवर ओढवलेला पाण्याचा ताण कमी होईल. आज अनेक फळबागा कोमेजण्याच्या मार्गावर आहेत. ऊस, भाजीपाला, पानमळे यांची परिस्थिती गंभीर असून या पिकांना वाचवण्यासाठी पाण्याची त्वरित गरज आहे.
भूगर्भातील पाण्याची पातळी वेगाने खाली जात असल्याने अनेक विहिरी व बोअरवेल कोरड्या पडत आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांमध्ये टंचाई अधिक तीव्र होत असून जनावरांच्या पाण्याचीही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जलसाठ्यांमध्ये तातडीने पाणी सोडण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे.
निवेदन स्विकारताना आमदार सुरेशभाऊ खाडे यांनीही शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांची दखल घेत तातडीची कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी भाजप नेहमीच आघाडीवर राहिले आहे. लवकरात लवकर म्हैशाळ योजनेचे पाणी सोडण्यासाठी प्रयत्न सुरू असून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
मिरजच्या पूर्व भागातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने तत्काळ निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली असून शेतकरी व नागरिकांना पाण्याचा दिलासा कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.