विदर्भ

धरणात बुडालेल्या शेतकऱ्याचा मृतदेह बाहेर ; संत गाडगेबाबा बचाव पथकाचे थरारक ऑपरेशन

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

कारंजा तालुक्यातील कीनखेड शिवारातील धरणात बुडालेल्या शेतकऱ्याचा मृतदेह अखेर संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाने शोधून काढला. मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनतर्फे संचालित या पथकाने दाखविलेल्या धाडसामुळे अवघ्या एका तासात मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले.

कीनखेड येथील बाळू पुंडलीक पवार (वय अंदाजे 40) हे 6 डिसेंबर 2025 रोजी दुपारपासून बेपत्ता होते. धरणाच्या काठावर त्यांच्या चप्पल, मोबाईल आणि चष्मा आढळून आल्याने ते धरणात बुडाल्याची शक्यता व्यक्त होत होती. घटनेची माहिती मिळताच कारंजा लाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रात्री स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध घेतला गेला; मात्र अंधारामुळे शोधकार्याला यश आले नाही.

या घटनेची माहिती रात्री उशिरा पिंजर (जि. अकोला) येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवन-रक्षक दीपक सदाफळे यांना देण्यात आली. कारंजा पोलीस ठाण्याचे एएसआय जाधव, महेंद्र गाढवे, कीनखेडचे सरपंच निळकंठ सोनोने आणि सिंहासन जाधव यांनी संयुक्तपणे पथकाला पाचारण केले.

अंधारामुळे शोधकार्य थांबवून 7 डिसेंबर रोजी सकाळी पुन्हा सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले. दीपक सदाफळे यांच्या नेतृत्वाखाली मयूर साळेदार, अतुल उमाळे, विष्णू केवट, शेखर केवट, गोपाल गिरे, अपूर्व चेके, अश्विन केवट, अजय डाके, ऋषिकेश मांगाडे, संजू पाटील, हर्षल वानखडे, विकास सदांशिव आदी सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

कारंजा पोलीस ठाण्याचे एपीआय मुकुंद जाधव यांच्या आदेशानुसार सकाळी शोधमोहीम सुरू झाली. जवळपास 25 फूट खोल पाण्यात जीवाची पर्वा न करता बचाव पथकातील जवानांनी पाण्यात झेप घेतली. अवघ्या एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर सकाळी 11.30 वाजता धरणातून बाळू पवार यांचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आला व पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

घटनास्थळी एपीआय मुकुंद जाधव, पोलिस कर्मचारी खोलेश्वर खुपसे, आशिष खांडरे, प्रफुल गावंडे, पोलिस पाटील, सरपंच निळकंठ सोनोने यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि नातेवाईक उपस्थित होते. या धाडसी कामगिरीबद्दल स्थानिक नागरिकांनी संत गाडगेबाबा आपात्कालीन बचाव पथकाच्या तत्परतेचे आणि शौर्याचे जाहीर कौतुक केले.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही