गुन्हे विश्व्महाराष्ट्र

मिरजेत दुचाकी चोरट्यांची जोडी जेरबंद ; २.४० लाखांच्या चार चोरीच्या मोटारसायकली हस्तगत

सांगली पोलिसांच्या विशेष पथकाची धडक कारवाई

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे

मिरज | सांगली जिल्ह्यात वाहनचोरीच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्याच्या दृष्टीने मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने मोठे यश मिळविले आहे. मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीतील दोन सराईत चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद करत त्यांच्याकडून सुमारे २ लाख ४० हजार रुपये किमतीच्या चार चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे महाराष्ट्रासह कर्नाटकातील एकूण तीन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

आयुब अब्दुलरशीद मन्ना (वय ३४) आणि संदीप सूर्यकांत येलूरकर (वय ३८, दोघेही रा. नम्रता कॉलनी, बुधगाव, ता. मिरज) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी या गुन्ह्यांचा तपास हाती घेतला होता.

पोलिसांनी तांत्रिक माहिती संकलित करून वाहनचोरांचा शोध सुरू केला. दरम्यान, ता. १२ रोजी स.पो.नि. संदीप शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की, दोन संशयित इसम चोरीची मोटारसायकल विक्रीसाठी मिरज–कोल्हापूर रोडवरील रजपूत मंगल कार्यालयाजवळील पुलाखाली येणार आहेत. या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचला.

नमूद ठिकाणी दोन इसम विना नंबर प्लेटच्या होंडा युनिकॉर्न मोटारसायकलसह संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आले. पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी ता. ८ रोजी मिरज येथील सिनर्जी हॉस्पिटल परिसरातून सदर मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. पुढील तपासात त्यांच्याकडून होंडा युनिकॉर्न, हिरो एचएफ डिलक्स तसेच दोन हिरो स्प्लेंडर प्लस अशा एकूण चार चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या.

या कारवाईमुळे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे तसेच कर्नाटकातील सदलगा पोलीस ठाणे हद्दीतील वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने दि. १५ डिसेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सूरज पाटील करीत आहेत.

या धडक कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन कुंभार, सूरज पाटील, पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ, मोहसिन टिनमेकर, विनोद चव्हाण, राजेंद्र हारगे तसेच चालक सतीशकुमार पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली. दरम्यान, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने नागरिकांना मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांबाबत माहिती देऊन पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही