महाराष्ट्रशैक्षणिक

इचलकरंजीतील शाळेत धक्कादायक प्रकार ; चिमुकलीला शिक्षिकेकडून बेदम मारहाण, पालक संतप्त

कोल्हापूर | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

इचलकरंजी शहरातील एका खाजगी शाळेत अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली असून तिसरीत शिकणाऱ्या एका चिमुकली विद्यार्थिनीला किरकोळ कारणावरून महिला शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून शाळेतील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित शाळेतील वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने अत्यंत छोट्या कारणावरून शिक्षिकेच्या रागाला सामोरे जावे लागले. वर्गातील एका क्षुल्लक बाबीवरून शिक्षिकेने रागाच्या भरात थेट मुलीला मारहाण केली. या मारहाणीमुळे चिमुकलीच्या शरीरावर जखमेच्या खुणा उमटल्या असून हात, पाठीवर व पायांवर मारहाणीच्या खुणा स्पष्टपणे दिसून येत आहेत.

फक्त शारीरिकच नव्हे तर या घटनेमुळे मुलीला मानसिक धक्का बसला असून ती प्रचंड घाबरलेली आहे. शाळेत जाण्याची भीती तिच्या मनात निर्माण झाली असून, रात्री झोप न लागणे, घाबरून रडणे अशी लक्षणे दिसून येत असल्याचे पालकांनी सांगितले. “मुलगी पूर्वी आनंदाने शाळेत जायची, पण या घटनेनंतर तिच्या चेहऱ्यावरची हसू गायब झाले आहे,” अशी भावना पालकांनी व्यक्त केली.

घटनेची माहिती मिळताच पालकांनी तातडीने शाळा प्रशासनाकडे धाव घेतली. यावेळी शाळेच्या कार्यालयात तीव्र शब्दांत संताप व्यक्त करण्यात आला. “शाळा म्हणजे केवळ शिक्षण देण्याची जागा नसून ती संस्काराचं मंदिर असते. अशा ठिकाणी जर मुलांवर अमानुष अत्याचार होत असतील, तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया पालकांनी दिली.

पालकांनी संबंधित शिक्षिकेविरोधात तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सदर शिक्षिकेला निलंबित करून तिच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शाळेने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. काही पालकांनी तर कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा इशाराही दिला आहे.

दरम्यान, या प्रकरणाची अधिकृत चौकशी होणार का, शाळा प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार आणि संबंधित शिक्षिकेविरोधात नेमकी काय कारवाई केली जाणार, याकडे संपूर्ण इचलकरंजी शहराचे लक्ष लागले आहे. शिक्षणाच्या नावाखाली मुलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात कठोर भूमिका घेणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही