ग्रामीण भागात महावितरणचा गलथान कारभार ; शाळेसमोर लोंबकळत्या ताऱ्यांमुळे जीवितास धोका

LiVE NEWS | UPDATE
बुलढाणा | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
तालुका प्रतिनिधी | दीपक देशमुख
मेहकर तालुक्यातील बेलगाव येथे विद्युत वितरण कंपनी (महावितरण) यांच्या ढिसाळ कारभाराचा गंभीर प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषद शाळेसमोर काही अंतरावरच विद्युत ट्रान्सफार्मर बसवण्यात आला असून, त्यातून जाणाऱ्या तारा जमिनीच्या पातळीपर्यंत खाली लोंबकळत आहेत. या धोकादायक परिस्थितीमुळे शाळेत ये-जा करणाऱ्या लहान बालकांसह जनावरांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
सदर ट्रान्सफार्मरच्या डीपी बॉक्समधील फ्युज कनेक्शन व संपूर्ण वायरिंग अनेकदा जळालेल्या अवस्थेत दिसून येते. वारंवार संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारी करूनही बॉक्समध्ये नवीन किट किंवा वायर बसवण्यात येत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अंतर्गत बिघाड किंवा शॉर्ट सर्किटमुळे येथे अनेक वेळा आग लागण्याच्या घटना घडल्या असून, त्यामुळे संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा खंडित होतो. भविष्यात मोठ्या प्रमाणावर आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विशेष म्हणजे, ग्रामीण भागात आग विझवण्यासाठी पुरेसा पाणी साठा उपलब्ध नसल्याने अशा घटनांमध्ये मोठी दुर्घटना होण्याचा धोका अधिक आहे. समोरच जिल्हा परिषद शाळा असल्याने लहान मुलांना उघड्या व लोंबकळत्या ताऱ्यांचा धोका लक्षात येत नाही. जर अचानक शॉर्ट सर्किट झाला, तर मोठी जीवितहानी होऊ शकते. अशा वेळी जबाबदारी कोणाची, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
गावात कायमस्वरूपी लाईनमन उपलब्ध नसल्याने समस्या अधिक गंभीर बनली आहे. महावितरण कार्यालयात फोन केल्यास प्रतिसाद मिळत नाही, आणि “लाईनमनला फोन करा” असे सांगितले जाते; मात्र तो लाईनमन कोण, याची माहितीही नागरिकांना नाही. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत सामान्य नागरिकांनी संपर्क कुणाशी साधावा, हा प्रश्न उभा राहतो.
या पार्श्वभूमीवर महावितरणने तातडीने ट्रान्सफार्मरच्या आउटपुट केबल्स नवीन सुरक्षित कोटिंगच्या बसवाव्यात, डीपी बॉक्समध्ये नवीन किट व वायरिंग करावी, तसेच गावात लाईनमनची नियमित नियुक्ती करून देखरेख वाढवावी, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर राहील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.