महाराष्ट्रराजकीय

नगरपालिका निकालांत महायुतीची बाजी ; भाजपची २१२ जागांवर निर्णायक आघाडी

मुंबई | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | सचिन गवारे

राज्यातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल हळूहळू स्पष्ट होत असताना महायुतीने निर्णायक आघाडी घेतल्याचे चित्र समोर आले आहे. आतापर्यंतच्या निकालांनुसार महायुतीने तब्बल २१२ जागांवर आघाडी किंवा विजय मिळवला असून भाजपने या निवडणुकांत वर्चस्व राखले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची छाप पुन्हा एकदा या निकालांतून दिसून येत आहे.

उपलब्ध माहितीनुसार भाजप १२७ पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर असून महाविकास आघाडीला सुमारे ५४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. काही ठिकाणी मतमोजणी अंतिम टप्प्यात असून भाजपची आघाडी आणखी भक्कम होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील गेवराई नगरपालिकेत भाजपच्या गीता पवार यांनी विजय मिळवत पक्षाचा झेंडा फडकावला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी नगरपालिकेत भाजपचे अभय आव्हाड यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत बाजी मारली. या निकालांमुळे ग्रामीण आणि निमशहरी भागातही भाजपची पकड मजबूत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, भुसावळ नगरपालिकेच्या अत्यंत चुरशीच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. रविवारी सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या रजनी सावकारे आघाडीवर आहेत. तसेच प्रभाग क्रमांक एकमधून भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत.

एकूणच नगरपालिका निवडणुकांच्या निकालांतून भाजप व महायुतीची ताकद अधोरेखित होत असून राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांची रणनीती पुन्हा एकदा यशस्वी ठरत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही