महाराष्ट्रराजकीय

तब्बल ३० वर्षांनंतर उलटफेर ; भाजपच्या गडाला भगदाड ; ४०० कार्यकर्त्यांसह संदीप जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश

सातारा | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे

पाटण | ढेबेवाडी विभागातील राजकारणात मोठा उलटफेर घडला असून भाजपच्या पाटणकर गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. सरपंच संघाचे उपाध्यक्ष संदीप जाधव यांच्यासह सरपंच, उपसरपंच, विविध पदाधिकारी आणि सुमारे ४०० कार्यकर्त्यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.

या प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने पाटण–ढेबेवाडी येथे शिवसेनेचा कार्यकर्ते संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्यादरम्यान शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीबरोबरच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठीची रणनीती स्पष्ट करण्यात आली. ग्रामीण भागातील विकास, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सक्षमीकरण हे मुद्दे या वेळी केंद्रस्थानी होते.

यावेळी बोलताना मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपच्या पाटणकर गटाच्या कार्यपद्धतीवर अप्रत्यक्ष टीका केली. भाजपमध्ये गेलेल्या पाटणकर गटाच्या कार्यपद्धतीला कंटाळून तसेच शिवसेनेकडून पाटण–ढेबेवाडी भागात सुरू असलेल्या विकासकामांवर विश्वास ठेवून आज कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले आहेत. लोकांच्या प्रश्नांवर थेट काम करणारी शिवसेना हीच सामान्यांची खरी ताकद आहे, असे त्यांनी सांगितले. आगामी काळात तालुक्यातील विकासकामांचा वेग अधिक वाढवण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

नव्याने शिवसेनेत प्रवेश केलेले सरपंच संघाचे उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली पाटण तालुक्यात झालेली विकासकामे सर्वसामान्यांना दिसत आहेत. या विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्यासाठी आणि लोकांसाठी प्रभावीपणे काम करण्यासाठी आम्ही शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

या मोठ्या पक्षप्रवेशामुळे पाटण तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून भाजपच्या पाटणकर गटाला संघटनात्मक पातळीवर मोठा फटका बसल्याचे मानले जात आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत शिवसेना अधिक आक्रमक आणि आत्मविश्वासाने उतरण्याचे संकेत या घडामोडीतून मिळत आहेत. राजकीय वर्तुळात या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही