विदर्भसामाजिक

निर्यात ही जिल्ह्याच्या आर्थिक विकासाची किल्ली ; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

जिल्ह्यातील कृषी, प्रक्रिया उद्योग व स्थानिक उत्पादनांमध्ये मोठी निर्यात क्षमता आहे. उद्योजकांनी केवळ स्थानिक बाजारपेठेपुरते मर्यादित न राहता जागतिक बाजारपेठेचा विचार करावा. निर्यात वाढल्यास रोजगारनिर्मितीला चालना मिळून जिल्ह्याचा सर्वांगीण आर्थिक विकास साधता येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयाच्या निर्देशानुसार ‘महा निर्यात – इग्नाइट कन्व्हेन्शन २०२६’ या उपक्रमांतर्गत वाशिम येथे आयोजित जिल्हास्तरीय एकदिवसीय निर्यात कार्यशाळा उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडली. हॉटेल दानीश एम्पायर येथे झालेल्या या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी कुंभेजकर बोलत होते.

यावेळी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक पुनम घुले, उद्योग सहसंचालक निलेश निकम, डीजीएफटीचे यंग प्रोफेशनल गणेश सोनवणे, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर संकेत निनावे, मैत्री कक्षाच्या प्रियदर्शिनी सोनार, जी.एम. इंडिया सेरेमिक सोल्युशनचे संदीप धोटे, एईटीमचे सीए अंकित गुप्ता, बीआरएन मोबिलिटीचे को-फाउंडर संकेत राजे, पोस्ट विभागाचे वरिष्ठ अधीक्षक सी. व्ही. रामा रेड्डी, सहाय्यक व्यवस्थापक उमेश रानोलिया, कृषी उपसंचालक हिना शेख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा, आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व उद्योजक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योग सहसंचालक निलेश निकम यांनी केले. ‘महा निर्यात’ उपक्रमामागील शासनाची भूमिका स्पष्ट करत जिल्हास्तरावर निर्यातक्षम उद्योग उभारण्यासाठी अशा कार्यशाळा महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्ह्यातील उद्योजकांनी या संधीचा लाभ घेऊन निर्यात क्षेत्रात पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यशाळेचा उद्देश जिल्ह्यातील उद्योजक, निर्यातदार, औद्योगिक संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO), स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना निर्यात प्रक्रियेबाबत सखोल व व्यावहारिक मार्गदर्शन देणे हा होता. कार्यशाळेत निर्यात नोंदणी प्रक्रिया, परदेशी बाजारपेठेत प्रवेशाच्या संधी, निर्यात प्रोत्साहन योजना व शासकीय अनुदाने, कृषी व प्रक्रिया उद्योगांची निर्यात क्षमता, एमएसएमई व एफपीओसाठी निर्यात धोरणे तसेच जिल्हा निर्यात केंद्र संकल्पना या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. उपस्थित उद्योजकांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली.

समारोपप्रसंगी महाव्यवस्थापक पुनम घुले यांनी उपस्थितांचे आभार मानत जिल्ह्यातील उद्योजकांनी निर्यात क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही