महाराष्ट्र

माधवनगरात मध्यरात्री भीषण आग ; चार दुकाने जळून खाक, लाखो रुपयांचे नुकसान

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

प्रतिनिधी | श्रीकांत यमगर

माधवनगर येथील जुनी रेल्वे लाईन बायपास रोड परिसरात शुक्रवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत चार दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली. या आगीत संबंधित व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बायपास रस्त्यालगत असलेल्या शेडमध्ये विविध व्यावसायिकांची दुकाने आहेत. शुक्रवारी (ता. ९) मध्यरात्री सुमारे दीड ते पावणेदोनच्या दरम्यान येथील मसाला व ड्रायफ्रुटच्या दुकानाला अचानक आग लागली. मसाल्याचा उग्र वास आणि धुराचे लोट दिसू लागल्याने दुकानाच्या मागील बाजूस राहणाऱ्या नागरिकांना जाग आली. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि शेजारील दुकानेही आगीच्या विळख्यात सापडली.

या भीषण आगीत इलेक्ट्रिक साहित्याचे दुकान, हेअर कटिंग सलून, टू-व्हीलर ऑटो गॅरेज तसेच मसाला व ड्रायफ्रुटचे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले. दुकानांमधील माल, फर्निचर व साहित्य राखेत मिसळल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ दुकान मालकांना आणि अग्निशमन दलाला कळवले. सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी घटनास्थळी दाखल होऊन काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. वेळेत मदत मिळाल्याने आग इतर भागात पसरण्यापासून रोखता आली.

सुदैवाने ही घटना मध्यरात्री घडल्याने दुकाने बंद होती आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्टसर्किटमुळेच आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पीडित छोट्या व्यावसायिकांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही