राज्यातील २९ महापालिकांचा रणसंग्राम ; प्रतिष्ठा, सत्ता आणि अस्तित्वाची अंतिम लढाई ; मतदार ठरवणार विजेता

LiVE NEWS | UPDATE
मुंबई | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीने अक्षरशः राजकीय रणांगण पेटले आहे. गुरुवारी (दि. १५) मतदान आणि शुक्रवारी (दि. १६) सकाळपासून मतमोजणी होत असताना, ही निवडणूक केवळ नगरसेवक निवडण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर सत्ताधारी, विरोधक, फुटलेले पक्ष आणि नव्या युतींसाठी ही प्रतिष्ठा, ताकद आणि अस्तित्वाची लढाई बनली आहे.
राज्यातील एकूण २ हजार ८६९ जागांसाठी तब्बल १५ हजार ९०८ उमेदवार मैदानात उतरले आहेत. म्हणजेच प्रत्येक जागेसाठी सरासरी पाचपेक्षा अधिक दावेदार. मुंबईत सर्वाधिक १,७०० उमेदवार, तर इचलकरंजीत सर्वात कमी २३० उमेदवार रिंगणात आहेत. मतदारसंख्या ३ कोटी ४८ लाखांहून अधिक, मतदान केंद्रे ३९ हजार ९२ आणि ईव्हीएमची प्रचंड यंत्रणा या सर्व आकड्यांवरूनच या निवडणुकीचे गांभीर्य स्पष्ट होते.
मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, कल्याण-डोंबिवली, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती, अकोला यांसह चंद्रपूर, लातूर, परभणी, भिवंडी-निजामपूर, मीरा-भाईंदर, पनवेल, नांदेड-वाघाळा, सांगली-मिरज-कुपवाड, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, इचलकरंजी आणि जालना संपूर्ण राज्यात एकाच वेळी राजकीय सामना रंगला आहे.
या सामन्यात युती आणि आघाड्यांची गणिते पूर्णपणे बदललेली दिसतात. सत्ताधारी महायुती काही मोजक्या ठिकाणीच एकत्र तर अनेक शहरांत मित्रच शत्रू बनले आहेत. शिवसेना-भाजप मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह काही ठिकाणी सोबत, तर उर्वरित शहरांत आमनेसामने. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूटीनंतर अजित पवार आणि शरद पवार पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये एकत्र, तर २५ वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणे हा या निवडणुकीतील सर्वात मोठा राजकीय ट्विस्ट ठरतो. मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची पहिलीच युती झाली आहे.
राज्य सरकारने मतदानाचा टक्का वाढावा म्हणून १५ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. सरकारी, निमशासकीय कार्यालये, बँका, सार्वजनिक उपक्रम आणि खासगी आस्थापनांनाही ही सुट्टी लागू आहे. मात्र, प्रचारात विकासापेक्षा आरोप-प्रत्यारोप, भावनिक आवाहने आणि ताकद प्रदर्शन अधिकच दिसले. त्यामुळे मतदार नेमका कोणाच्या बाजूने कौल देणार, हा प्रश्न सर्वांना अस्वस्थ करणारा ठरला आहे.
ईव्हीएम, पोलिस बंदोबस्त, बहुसदस्यीय प्रभाग पद्धत, मुंबईतील एकसदस्यीय पद्धत सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आता चेंडू मतदारांच्या कोर्टात आहे. शुक्रवारी निकालाच्या दिवशी कोणाचा विजयाचा झेंडा फडकणार आणि कोणाच्या राजकीय महत्वाकांक्षांना धक्का बसणार, हे संपूर्ण महाराष्ट्र पाहणार आहे.
ही निवडणूक म्हणजे नगरसेवकांची नव्हे, तर राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी निर्णायक लढत ठरणार आहे.