
LiVE NEWS | UPDATE
लातूर | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
देवणी प्रतिनिधी | देवणी पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागात प्रभारी गटशिक्षणाधिकारी संजय शिंदाळकर यांच्या अकार्यक्षम, मनमानी व संशयास्पद कारभाराविरोधात जनतेचा उद्रेक झाला असून, संपूर्ण शिक्षण खाते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचार विरोधी समितीने शिंदाळकर यांच्या कार्यकाळाची सखोल चौकशी करून तात्काळ हकालपट्टीची मागणी करत प्रशासनाला थेट आव्हान दिले आहे.
प्रभारी पदाचा गैरफायदा घेत शिक्षण विभागात अनागोंदी, बेपर्वाई व भ्रष्टाचार बोकाळल्याचा आरोप करण्यात येत आहे. जिल्हा परिषद शाळांमधील काही मुख्याध्यापकांना हाताशी धरून शालेय पोषण आहार (खिचडी) योजनेच्या निधीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा गंभीर संशय व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या ताटातील घासावर डल्ला मारला जात असल्याचा संतप्त आरोप नागरिक करत आहेत.
कामचुकार शिक्षक व मुख्याध्यापकांना खुलेआम पाठीशी घातले जात असून, प्रामाणिक अधिकारी व शिक्षकांना डावलले जात असल्याचे चित्र आहे. मुख्याध्यापकांविरोधातील तक्रारी मुद्दाम दाबून ठेवण्यात येत असून, दोषींना अभय दिले जात असल्याचा आरोप समितीने केला आहे. परिणामी, शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता घसरत असून विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात ढकलले जात आहे.
शिक्षण विषयक तक्रारी घेऊन गेलेल्या पालक व नागरिकांशी प्रभारी गटशिक्षणाधिकारी उर्मट व उद्धट भाषेत बोलतात, फोन उचलत नाहीत, अशी गंभीर तक्रार समोर आली आहे. शिक्षण विभाग जनतेपासून तुटल्याचे हे जिवंत उदाहरण असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. प्रशासनाच्या या दादागिरीमुळे जनतेचा रोष दिवसेंदिवस वाढत आहे.
या सर्व गैरप्रकारांची तातडीने सखोल चौकशी करून प्रभारी गटशिक्षणाधिकारी संजय शिंदाळकर यांच्या संपूर्ण कार्यकाळातील कागदपत्रांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. दोषी आढळल्यास कोणतीही दया न दाखवता कठोर शिस्तभंगाची कारवाई करून पदावरून तात्काळ हटवावे, अशी मागणी जोर धरत आहे.
देवणी पंचायत समितीत प्रभारी राज संपवून सक्षम, कर्तव्यदक्ष व कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी नेमावा, अन्यथा आंदोलन पेटेल, असा थेट इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास शिक्षण संचालनालय, पुणे येथे बेमुदत आमरण उपोषण छेडण्याचा इशारा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मदरफी यांनी दिला आहे.