मराठवाडा

शिऊरचा पाझर तलाव ‘चोरीला’ ; प्रशासन व माफियांची उघड मिलीभगत ; शेतकऱ्यांचा पाण्याचा कणा मोडीत

लातूर | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

निलंगा प्रतिनिधी | निलंगा तालुक्यातील शिऊर गावातील सर्वे नं. १ या शासकीय गायरान जमिनीवरील सुमारे ३ एकर क्षेत्रफळाचा पाझर तलाव अक्षरशः नामशेष करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या प्रकरणाने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. गावकऱ्यांच्या पाण्याचा जीवनदायिनी असलेला हा पाझर तलाव दिवसाढवळ्या हजारो ब्रास खडक व मुरूम उपसा करून बुजवला जात आहे. हा प्रकार केवळ बेकायदेशीर नसून, त्यामागे कब्जेदार माफिया व प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची उघड मिलीभगत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

हा पाझर तलाव शिऊर गावातील शेतकरी, जनावरे व भूजल पातळीचा कणा मानला जातो. उन्हाळ्यात गावाची तहान भागवणारा हा तलाव आज माफियांच्या लोभाचा बळी ठरत आहे. विना परवाना, विना रॉयल्टी, कोणतीही अधिकृत परवानगी नसताना भरदिवसा जेसीबी व डंपरच्या सहाय्याने मुरूम उपसा करून तलाव बुजवण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे हा सर्व गैरप्रकार तहसीलदाराच्या ‘आशीर्वादाने’ सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थ व तक्रारदार उघडपणे करत आहेत.

कार्यकारी अभियंत्यांचीही भूमिका संशयास्पद
या प्रकरणात जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या संगनमताने तलाव बुजवण्याचे काम सुरू असल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये आहे. तलाव बुजवून त्या जागेवर गुळ उद्योग सुरू करण्याचा डाव आखला जात असल्याची माहिती समोर येत आहे. शासकीय गायरान जमिनीवर थेट अतिक्रमण करून उद्योग उभारण्याचा हा प्रकार म्हणजे शासनाच्या कायद्यालाच खुले आव्हान आहे.

प्रशासन बघ्याची भूमिका, कायदे पायदळी
पर्यावरण संरक्षण कायदे, जलसंधारण नियम, महसूल अधिनियम यांचे सरळ उल्लंघन होत असताना संबंधित प्रशासन मात्र हातावर हात धरून बसल्याचे चित्र आहे. गावकऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. “कायदे फक्त सामान्यांसाठीच आहेत का?” असा सवाल आता शेतकरी वर्ग विचारत आहे.

शेतकऱ्यांवर भीषण परिणाम
पाझर तलाव बुजवल्यामुळे शिऊर गावातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. आगामी हंगामात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भूजल पातळी खालावण्याचा धोका वाढला असून, जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिणामी गावकऱ्यांच्या उदरनिर्वाहावर थेट घाला घालण्यात आला आहे.

तक्रारीनंतर चौकशी, पण कारवाई कुठे?
या गंभीर प्रकरणी दि. १९ जानेवारी २०२६ रोजी अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून, त्यानंतर निलंगा तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले जाते. अहवाल प्राप्त होताच योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात मात्र काम सुरूच असल्याने या चौकशीवरही संशय व्यक्त केला जात आहे.

आंदोलनाचा इशारा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. “हा पाझर तलाव गावाची जीवनवाहिनी आहे. प्रशासनाच्या संगनमताने तो नष्ट केला जात आहे. तात्काळ काम थांबवून दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर शेतकरी वर्गासह लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

मागण्या ठाम
पाझर तलाव बुजवण्याचे काम तात्काळ थांबवावे,
टाकलेला खडक व मुरूम हटवून तलाव पूर्ववत करावा,
संबंधित अधिकारी व माफियांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी शिऊरच्या संतप्त शेतकरी वर्गातून होत आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही