महाराष्ट्रविदर्भ

दारूबंदीचा निर्णय भारी, गावात खुलेआम विक्री मात्र सुरू सारी

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
मंगरुळपीर तालुक्यातील जनुना बु. गावात ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव एकमुखाने मंजूर होऊनही प्रत्यक्षात अवैध दारूविक्री बेधडक सुरू असल्याचे संतप्त चित्र समोर आले आहे. ग्रामसभेचा निर्णय पायदळी तुडवत गावात गावठी दारूचा अक्षरशः महापूर आला असून प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

गावातील युवक दारूच्या विळख्यात अडकत असल्याने त्यांच्या भविष्यावर गदा येत आहे. विद्यार्थिनी व महिलांना सार्वजनिक ठिकाणी असुरक्षिततेचा सामना करावा लागत असून सामाजिक वातावरण ढासळत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. परिस्थिती गंभीर असताना पोलिस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने महिलांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

यापूर्वी ग्रामसभेत गावातील दारूविक्री पूर्णतः बंद करण्याचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला होता. ग्रामपंचायतीनेही दारूबंदीचा निर्णय जाहीर केला होता. मात्र ठरावानंतरही गावात खुलेआम दारू विक्री सुरू असल्याने ठराव केवळ कागदापुरताच का? असा सवाल उपस्थित होत आहे.

महिला व बचतगटांनी एकत्र येत प्रशासनाला लेखी निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे. वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई का होत नाही? असा थेट प्रश्न पोलिस यंत्रणेला विचारण्यात आला आहे. पोलिसांच्या उदासीनतेमुळे अवैध विक्रेत्यांचे मनोबल वाढल्याचा आरोपही महिलांनी केला आहे.

गावात सर्रास दारू विक्री होत असल्याने महिलांना व विद्यार्थिनींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सामाजिक शिस्त बिघडवणाऱ्या या प्रकारामुळे जनुना बु. गावात संताप उसळला आहे. प्रशासनाने तात्काळ छापेमारी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जोर धरत आहे.

महिलांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल. ग्रामसभेच्या निर्णयाचा अवमान सहन केला जाणार नाही. गावातील दारूविक्री कायमस्वरूपी बंद करून दोषींवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अन्यथा जनआक्रोश उफाळून येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही