गुन्हे विश्व्विदर्भ

पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यात पतीला जन्मठेप; चरित्रावर संशयातून निर्घृण हत्या

मानोली (ता. मंगरुळपीर) येथील घटना ; न्यायालयाचा कठोर निर्णय

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची निर्घृण हत्या करणाऱ्या पतीला मंगरुळपीर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ग्राम मानोली येथील आरोपी रोशन विजय उगले याला भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत आजन्म कारावास (जन्मठेप) तसेच 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागेल, असा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश वैभव व्ही. पाटील यांनी 5 मार्च रोजी खुल्या न्यायालयात दिला.

या प्रकरणातील सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी श्रीकृष्ण तुळशिराम वाकोडे (रा. आरखेड) यांच्या चुलत पुतणी रिना (वय 20) हिचा विवाह 29 जुलै 2020 रोजी मानोली येथील रोशन विजय उगले याच्यासोबत समाजाच्या रितीरिवाजानुसार झाला होता. लग्नानंतर सुरुवातीच्या काही दिवसांत रिनाला चांगले वागणूक देण्यात आली. मात्र काही दिवसांनंतर आरोपी रोशन उगले याने तिच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली.

दसऱ्याच्या सुमारास आरोपीने रिनाला माहेरी आरखेड येथे आणून सोडले व तिला परत नांदवायचे नसल्याचे सांगितले. त्यावेळी रिनाने आपल्या नातेवाईकांना पतीकडून होत असलेल्या छळाची माहिती दिली होती. त्यानंतर नातेवाईकांनी मध्यस्थी करून दोघांना समजावून सांगितले आणि रोशन उगले रिनाला परत मानोली येथे घेऊन गेला.

मात्र 10 एप्रिल 2021 रोजी दुपारी सुमारे 3 वाजता रिनाची प्रकृती खराब असल्याचे सांगत तिच्या नातेवाईकांना मानोली येथे बोलावण्यात आले. तेथे पोहोचल्यावर रोशन उगले याने रिनाला लोखंडी पाईपने डोक्यावर, डोळ्यावर व गळ्यावर मारहाण करून तिचे डोके फरशीवर आपटत निर्घृणपणे ठार मारल्याचे उघड झाले. या घटनेनंतर फिर्यादी श्रीकृष्ण वाकोडे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

तक्रारीवरून आरोपी रोशन उगले याच्याविरुद्ध 10 एप्रिल 2021 रोजी भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेंबडे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध मंगरुळपीर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. गुन्हा घडल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली होती आणि खटला निकाली निघेपर्यंत त्याला जामीनही मंजूर करण्यात आला नव्हता.

या खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता गोवर्धन गंगावणे यांनी एकूण 21 साक्षीदारांची साक्ष न्यायालयात नोंदवली. काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार न्यायालयात फितूर झाले असले तरी उर्वरित साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवाल, रासायनिक विश्लेषण, न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचा अहवाल तसेच परिस्थितीजन्य पुरावे यांचा आधार घेत न्यायालयाने आरोपी दोषी ठरवला.

सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता गोवर्धन गंगावणे यांनी बाजू प्रभावीपणे मांडली. या प्रकरणात मंगरुळपीरचे ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सुरुवातीला एल.पी.सी. सुवर्णा मनवर (ब. नं. 901) व नंतर पोलिस हवालदार राम नागूलकर (ब. नं. 1004) यांनी महत्त्वपूर्ण मदत केली. त्यांच्या सहकार्यामुळे आरोपीच्या दोषसिद्धीस हातभार लागल्याचे सांगितले जात आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही