गुन्हे विश्व्महाराष्ट्र

देशी पिस्टलसह आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) सांगलीच्या पथकाने विनापरवाना अग्निशस्त्र व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील एका आरोपीला जेरबंद करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत आरोपीकडून सुमारे ५० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १० मार्च २०२६ रोजी सायंकाळी संख (ता. जत) परिसरात करण्यात आली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी हणमंत नलवडे (वय ३३ वर्षे, रा. एच.पी. गॅस गोडाऊन जवळ, संख, ता. जत, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६२/२०२६ नोंद करण्यात आला असून त्याच्यावर भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी विशेष पथक तयार करून अशा संशयितांची माहिती गोळा करण्याचे निर्देश दिले होते.

या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून माहिती मिळवली. संख ते अंकलगी रोडवरून संख तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या कट्ट्यावर एक इसम विनापरवाना पिस्टल बाळगून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. पोलिसांना पाहून संशयित इसम पळण्याच्या तयारीत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव संभाजी हणमंत नलवडे असल्याचे सांगितले.

पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेच्या उजव्या बाजूला पॅन्टमध्ये एक देशी बनावटीचे पिस्टल खोचलेले आढळले. तसेच त्याच्या जिन्स पॅन्टच्या समोरील लहान खिशातून तीन जिवंत काडतुसे (राऊंड) मिळून आली. पोलिसांनी तात्काळ ५० हजार रुपयांचे पिस्टल व ६०० रुपयांची काडतुसे असा एकूण ५० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपीकडे सदर अग्निशस्त्र बाळगण्याबाबत कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. पुढील चौकशीत आरोपीने हे पिस्टल राहुल माने (रा. माजी सैनिक वसाहत, मिरज) याच्याकडून विकत घेतल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

या प्रकरणी रोहन सुभाष घस्ते (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली) यांनी उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पुढील तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, सपोफौ अनिल ऐनापुरे, पोहेकॉ आमसिद्ध खोत, अमोल ऐदाळे, इम्रान मुल्ला, सोमनाथ गुंडे, अमर नरळे, पोना अनंत कुडाळकर, चापोहेकॉ शिवाजी सिद, पोशि रोहन घस्ते तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोशि अजय पाटील व अभिजीत पाटील यांच्या पथकाने संयुक्तरीत्या पार पाडली.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही