अवैध सावकारीवर धाड ; महत्त्वाचे कागद ताब्यात

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
रिसोड तालुक्यात बोकाळलेल्या अवैध सावकारी व्यवहारांवर अखेर प्रशासनाने धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. सहकार विभागाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने सहकार व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत झडतीची कारवाई करत महत्त्वाचे कागदपत्रे जप्त केली आहेत. या कारवाईमुळे अवैध सावकारी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, कायद्याला न जुमानणाऱ्या सावकारांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
सहकार विभागाकडे रिसोड तालुक्यातील अवैध सावकारी व्यवहारांबाबत दोन तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ च्या कलम १६ अंतर्गत तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानुसार दि. ६ मार्च २०२६ रोजी सहकार विभाग आणि पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने दोन स्वतंत्र पथके तयार करून रिसोड शहर व परिसरात धडक झडती मोहीम राबवली.
या कारवाईदरम्यान सचिन गणराज आप्पा गांजरे (रा. छत्रपती शिवाजी चौक, रिसोड) तसेच सुधाकर किसन टेकाळे (रा. चिखली, ता. रिसोड, जि. वाशिम) यांच्या राहत्या घरी झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान पुढील चौकशीसाठी काही महत्त्वाचे दस्तऐवज व नोंदी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या कागदपत्रांच्या आधारे सावकारी कायद्याअंतर्गत पुढील तपास सुरू असून संबंधित व्यक्तींविरोधात कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गावोगावी बेकायदेशीर सावकारीचे जाळे पसरत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. गरजवंत शेतकरी व सामान्य नागरिकांना जास्त व्याजदराने पैसे देऊन त्यांच्या अडचणींचा गैरफायदा घेतला जात असल्याचे आरोप होत असताना प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे दिसून येत आहे.
ही कारवाई जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) गितेशचंद्र साबळे यांच्या नियंत्रणाखाली संयुक्त पथकाने ही धडक मोहीम राबवली.
या पथकात सहाय्यक निबंधक गजानन फाटे (रिसोड), आर. आर. सावंत (प्रशासन), एम. डी. कच्छवे (पथक प्रमुख), पी. टी. सरकटे (पथक प्रमुख), सहकार अधिकारी एस. एस. पाटील, जे. एस. सहारे, मुख्य लिपिक पी. आर. वाडेकर, सहाय्यक सहकार अधिकारी कु. आर. एन. शेख, कनिष्ठ लिपिक ए. ए. बेले, व्ही. आर. ढोबळे, ए. डी. वानखेडे तसेच पोलिस व महसूल विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते.
दरम्यान, जिल्ह्यातील नागरिकांनी अवैध सावकारी व्यवहारांविरोधात पुढे येऊन सहकार विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अशा प्रकारच्या तक्रारी जिल्हा निबंधक (सावकारी) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशिम तसेच संबंधित तालुक्यातील सहाय्यक निबंधक कार्यालयात गोपनीय स्वरूपात नोंदवाव्यात, असेही सांगण्यात आले आहे. तक्रारदाराचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, अशी माहिती सहकार विभागाकडून देण्यात आली आहे.