विदर्भ

गावस्तरावर आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करा ; उपविभागीय अधिकारी आकाश वर्मा

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

कारंजा तहसील कार्यालय येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वाशिम, एनडीआरएफ (NDRF) ५ बटालियन पुणे व एसडीआरएफ (SDRF) नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापनाबाबत एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रशिक्षणामध्ये उष्मालाट, पूर, वीज पडणे, आग, भूकंप, रस्ते अपघात, सर्पदंश तसेच प्रथमोपचार यासंबंधी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारंजा येथील उपविभागीय अधिकारी आकाश वर्मा (भा.प्र.से.) हे होते, तर तहसीलदार रवी महाले हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) पोलीस निरीक्षक जालिंदर फुंदे, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (SDRF) पोलीस उपनिरीक्षक एस. पी. बोदर, तालुका कृषी अधिकारी भोसले, पोलीस निरीक्षक शिंदे, नायब तहसीलदार अनिल वाडेकर, विनोद हरणे, लक्ष्मण बनसोडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत तसेच सामाजिक कार्यकर्ते श्याम सवाई आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

प्रशिक्षणादरम्यान आपत्तीच्या प्रसंगी तातडीने कशी मदत करावी, बचाव कार्य कसे करावे आणि जीवितहानी कशी टाळावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः उष्मालाट, पूरस्थिती, विजेचा धक्का, आग लागणे, रस्ते अपघात किंवा सर्पदंश अशा प्रसंगात नागरिकांनी आणि स्थानिक प्रशासनाने कोणती खबरदारी घ्यावी याची माहिती देण्यात आली. तसेच प्रथमोपचार देणे, सीपीआर (CPR) करणे, जखमींना बँडेज बांधणे, बोटिंगद्वारे बचाव कार्य करणे अशा विविध प्रकारच्या आपत्कालीन उपाययोजनांचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी केले. त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वय असणे किती महत्त्वाचे आहे यावर प्रकाश टाकला.

अध्यक्षीय भाषणात उपविभागीय अधिकारी आकाश वर्मा यांनी गावस्तरावर आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. प्रत्येक गावाने संभाव्य नैसर्गिक आपत्ती लक्षात घेऊन नियोजन करणे आवश्यक आहे. आपत्तीच्या वेळी तातडीने प्रतिसाद देण्यासाठी स्थानिक पातळीवर सक्षम यंत्रणा तयार असणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच गावपातळीवरील कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य व स्वयंसेवकांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत सजग राहून आराखडा तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी तहसीलदार रवी महाले यांनीही मार्गदर्शन करताना आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज व्यक्त केली. आपत्तीच्या प्रसंगी वेळेवर मदत मिळाल्यास मोठी जीवितहानी टाळता येते, असे त्यांनी सांगितले.

या प्रशिक्षण कार्यक्रमास विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, शिक्षक, पोलीस कर्मचारी, आरोग्य सेवक व सेविका, कोतवाल, पोलीस पाटील, होमगार्ड कर्मचारी, वन विभाग कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका तसेच आपदा मित्र व आपदा सखी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन राहुल वरघट यांनी केले. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नायब तहसीलदार अनिल वाडेकर, मंडळ अधिकारी महेश धानोरकर, ग्राम महसूल अधिकारी अर्चना चिकटे, महसूल सहाय्यक लता मेश्राम, प्रभू बोरकर, बंडू तुरुक तसेच कोतवाल यांनी विशेष परिश्रम घेतले.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही