क्राईममहाराष्ट्र

कराडमध्ये गांजाचा बाजार ; अंमलीकृत पदार्थ विकणारा हाच तो भोसले अन् पवार ; पोलिसांचा जोरदार प्रहार

बुधवार पेठेत छापा; २ किलो ३३६ ग्रॅम गांजा जप्त, अंमली पदार्थांच्या जाळ्यावर पोलिसांचा घणाघात

सातारा | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

कराड शहरात वाढत्या अंमली पदार्थांच्या विळख्याविरोधात पोलिसांनी अखेर कडक भूमिका घेत धडक कारवाई केली. बुधवार पेठ परिसरात छापा टाकत गांजा विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला असून दोन संशयितांना रंगेहात जेरबंद करण्यात आले आहे. या कारवाईमुळे शहरातील अंमली पदार्थांच्या वाढत्या जाळ्याचा पर्दाफाश झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत तब्बल २ किलो ३३६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ५८ हजार ७०० रुपये इतकी आहे. अंमली पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत १६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांना बुधवार पेठेत गांजा विक्री सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचत संबंधित ठिकाणी छापा टाकला. कराड शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही धडक कारवाई केली. यावेळी सोन्या उर्फ शुभम दिलीप पवार आणि जगन्नाथ महिपती भोसले या दोघांना रंगेहात पकडण्यात आले.

पोलिसांनी दोघांकडून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला असून प्राथमिक चौकशीत हा माल कराड शहर आणि परिसरात विक्रीसाठी आणण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहरात अंमली पदार्थांचे जाळे किती खोलवर पसरले आहे, याचे गंभीर चित्र समोर आले आहे.

या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध अंमली औषधीद्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम, १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून या रॅकेटमागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेतला जात असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या समन्वयाने पार पडली. यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम यांच्यासह संताजी जाधव, असिफ जमादार, प्रविण पवार, सागर बर्गे, मयूर देशमुख, अनिकेत पवार आणि दिग्विजय सांडगे या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

दरम्यान, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी या कारवाईचे कौतुक करत कराडमध्ये अंमली पदार्थ विक्रेत्यांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही. ही मोहीम आणखी तीव्र केली जाईल. असा इशारा देण्यात आला आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही