विदर्भ

मुरुमाच्या ढिगाऱ्याखाली दडलेला ‘मृत्यू’ अखेर बाहेर ; पोलीसांच्या तत्परतेने मृताची ओळख पटली ; मृतक पंचाळा येथील युवक

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

शहरात खळबळ उडवून देणाऱ्या भीषण हत्याकांडाचा छडा लावण्यात पोलिसांना पहिले मोठे यश मिळाले आहे. मुरुमाच्या ढिगाऱ्यात तुकड्या-तुकड्यांत सापडलेल्या मृतदेहाची वाशिम पोलिसांनी तत्परतेने ओळख पटवली असून, विठ्ठल कुंडलिक खडसे (वय ३२, मूळ रा. देवठाणा, सध्या रा. पंचाळा, जि. वाशिम) असे मृत तरुणाचे नाव आहे. या ओळखीनंतर पोलिसांच्या तपासाला वेग आला असून हत्येचे गूढ उकलण्याच्या दिशेने तपास सुरू आहे.

१७ मार्च रोजी रात्री मुरुमाच्या एका ढिगाऱ्यात कापलेले मानवी अवयव आढळल्याने संपूर्ण वाशिममध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. त्यानंतर १८ मार्च रोजी सकाळी संशयाच्या आधारे पुन्हा शोध घेतला असता, शेजारील दुसऱ्या मुरुमाच्या ढिगाऱ्याखाली गाडलेला विठ्ठल खडसे यांचा संपूर्ण मृतदेह आढळून आला.

मृतदेहाची अवस्था पाहता आरोपींनी अत्यंत थंड डोक्याने आणि क्रूरपणे ही हत्या केल्याचे स्पष्ट होत आहे. हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मुरुमाच्या ढिगाऱ्याचा वापर करण्यात आला होता. विठ्ठल खडसे यांची हत्या नेमकी कुठे करण्यात आली आणि मृतदेह या ठिकाणी कसा आणण्यात आला, याचा तपास पोलीस करत आहेत.

पोलीस अधीक्षकांकडून तपासावर विशेष लक्ष

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वाशिमचे जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. विठ्ठल खडसे यांच्या हत्येमागील कारणांचा शोध घेताना जुन्या वादांची पडताळणी सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच मोबाईल लोकेशनच्या आधारे संशयितांचा माग काढला जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संशयितांच्या मुसक्या आवळण्याच्या तयारीत आहे.

पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागले असून, येत्या २४ तासांत या हत्याकांडाचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. मृतकाची ओळख पटली असून पुराव्यांची साखळी जोडली जात आहे. वाशिम शहर, ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांची संयुक्त पथके वेगवेगळ्या दिशांनी तपास करत आहेत. लवकरच या भीषण गुन्ह्याचा मास्टरमाईंड जेरबंद होईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी दिली.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही