कृषी जगतविदर्भ

अनुदान घोटाळा दडपायला ‘साहेब’ धावले ; चौकशीला बगल, मेजवानीत रंगले

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

मंगरूळपीर तालुक्यातील फळबाग अनुदान अनियमितता प्रकरण दिवसेंदिवस चिघळत असतानाच आता या घोटाळ्याला दडपण्यासाठीच वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू असल्याचा गंभीर आरोप पुढे येत आहे. गोगरी, हिरंगी, खेरडा, चोरद, येडशी, भूर, पूर आणि शेलूबाजार येथील शेतकरी लाखो रुपयांच्या प्रलंबित अनुदानासाठी हेलपाटे मारत असताना, कृषी विभागातील अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिका उघड होत आहे.

१८ मार्च रोजी जिल्हा पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगरूळपीर तालुका कार्यालयाला भेट दिली. या भेटीत घोटाळ्याची सखोल चौकशी होईल, संबंधितांची कानउघाडणी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात चित्र उलटेच पाहायला मिळाले. आढावा बैठकीत कोणतीही ठोस चर्चा न करता उलट संशयित कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे ‘संदेश’ देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आज त्यांच्यावर वेळ आहे, उद्या तुमच्यावरही येऊ शकते, असे सांगत सर्वांनी एकजूट ठेवावी आणि प्रसारमाध्यमांना माहिती देऊ नये, असे सूतोवाच करण्यात आल्याची खात्रीलायक चर्चा आहे. या भूमिकेमुळे ‘कुंपणच शेत खायला उठले’ अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून उमटत आहे.

फळबाग अनुदानासारखे गंभीर प्रकरण उघडकीस आले असताना चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याऐवजी त्यांना उघड पाठबळ दिले जात असल्याने प्रशासनाच्या नीतिमत्तेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. जिल्ह्याचे जबाबदार अधिकारीच प्रकरण दडपण्याच्या भूमिकेत असतील, तर न्याय मागायचा कुणाकडे? असा सवाल आता शेतकरी विचारत आहेत.

साहेबांनी झोडली मनसोक्त मेजवाणी

या संपूर्ण प्रकरणाला अधिकच वादग्रस्त वळण देणारी बाब म्हणजे बैठकीनंतर रंगलेली मेजवानी. खात्रीलायक माहितीनुसार, पीडित शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत असताना, संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि काही संशयित कर्मचारी शहरातील नामांकित भोजनावळीत एकत्र जमले आणि मनसोक्त ‘मेजवानी’ झोडली.

एका बाजूला शेतकरी हक्काच्या अनुदानासाठी दारोदारी फिरत आहेत, तर दुसऱ्या बाजूला अधिकारी मेजवानीत दंग असल्याचे चित्र संतापजनक आहे. या प्रकारामुळे “वरूनच संरक्षण” मिळत असल्याची चर्चा जोर धरत आहे.

फळबाग अनुदानाचा घोटाळा खरंच उघडकीस येणार की ‘फाईल’ बंद करून प्रकरण गाडलं जाणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही