महाराष्ट्र

सर्वसामान्यांना नकार, सेटिंगवाल्यांना आधार ; पंपावर सुरू काळाबाजार

सातारा ! महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

आखाती देशांतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेल तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवांनी राज्यभरात खळबळ उडाली असताना, पाटण तालुक्यातील तळमावले येथील पाटण तालुका खरेदी-विक्री संघाच्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर संतापजनक प्रकार समोर आला आहे. ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असताना, पंपावरील लाईट बंद करून ‘ओळखीच्या’ आणि ठराविक लोकांनाच गुपचूप इंधन विक्री केल्याचा आरोप होत आहे.

सकाळपासून सोशल मीडियावर पेट्रोल संपणार, दर अचानक वाढणार अशा अफवा जोरात पसरल्या. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी, सातारा जिल्ह्यासह विविध शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर अक्षरशः झुंबड उडाली. बाटल्या, कॅन, डबे घेऊन नागरिकांनी इंधन साठवण्याचा आटापिटा सुरू केला.

मात्र, या भीतीच्या वातावरणाचा काही पंप चालकांनी गैरफायदा घेतल्याचा गंभीर आरोप होत आहे. तळमावले येथील पंपावर अचानक लाईट बंद करून सर्वसामान्य ग्राहकांना इंधन संपले असे सांगण्यात येत होते. पण त्याच वेळी मागच्या बाजूने किंवा निवडक लोकांना पेट्रोल-डिझेल देण्यात येत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे गरजूंना नकार, ओळखीवाल्यांना अधिकार असा संतापजनक प्रकार उघड झाला आहे.

दरम्यान, अशाच अफवांमुळे सातारा जिल्ह्यासह कराड पाटण व इतर शहरांतही अनेक पंपांवर गर्दी उसळली, काही ठिकाणी पंप बंद ठेवण्यात आले. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम अधिकच वाढला आहे. पेट्रोल खरोखर संपणार का? आणि दर वाढणार का? या प्रश्नांनी सर्वसामान्य हैराण झाले आहेत.

सर्वात मोठा प्रश्न असा की, उद्या खरोखरच गरज भासल्यास रुग्णवाहिका, शेतकरी, आपत्कालीन सेवा यांना इंधन मिळणार का? की अशाच ‘सेटिंग’च्या खेळात सामान्य नागरिकांना वंचित राहावे लागणार?

या प्रकारामुळे पंपचालकांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे. युद्ध असो वा अफवा संकटाच्या काळात नागरिकांची लूट आणि भेदभाव सहन केला जाणार नाही, असा संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून अशा प्रकारांना लगाम घालावा, अन्यथा परिस्थिती अधिकच चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही