मिरज मतदारसंघात कोट्यवधींची विकासझेप ; रस्ते, सिंचन, आरोग्य व धार्मिक प्रकल्पांना वेग

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
प्रतिनिधी | जयंत मगरे
मिरज | मार्च २०२६ च्या राज्य अर्थसंकल्पातून मिरज मतदारसंघासाठी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी मंजूर झाल्याने विविध पायाभूत प्रकल्पांना गती मिळणार आहे. आमदार सुरेश खाडे यांच्या पाठपुराव्यामुळे रस्ते, सिंचन, आरोग्य तसेच धार्मिक सुविधांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आली असून, यामुळे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राज्य मार्ग (SH) आणि प्रमुख जिल्हा मार्ग (MDR) अंतर्गत ग्रामीण रस्त्यांच्या रुंदीकरण व सुधारणा कामांसाठी तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे गावागावांतील दळणवळण अधिक सुकर होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी मौजे लिंगनूर येथील श्री यल्लमा देवी मंदिर परिसरात विविध सोयीसुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. भक्तनिवास, सभामंडप, टॉयलेट ब्लॉक, पेव्हिंग तसेच विद्युत रोषणाईसाठी सुमारे २ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
आरोग्य क्षेत्रातही मोठा निर्णय घेण्यात आला असून, मिरज शहरातील किसान चौक येथे १०० खाटांचे महिला व नवजात शिशु रुग्णालय उभारण्यासाठी ४६ कोटी ७३ लाख रुपयांना यापूर्वीच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पावरील स्थगिती उठवण्यात येणार असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे.
सिंचन क्षेत्रातही मोठी तरतूद करण्यात आली आहे. कृष्णा-कोयना उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत म्हैसाळ योजनेसाठी ४७ कोटी ४१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, आरग, बेडग, नरवाड आणि लक्ष्मीवाडी या भागांना पाणीपुरवठा होणार आहे. तसेच बनेवाडी उपसा सिंचन योजनेअंतर्गत भोसे तलावात कायमस्वरूपी पाणी भरण्यासाठी १३ कोटी ९३ लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
याशिवाय मालगाव, टाकळी, बोलवाड, बेडग, नरवाड, म्हैसाळ आणि वड्डी या सात गावांमध्ये सिंचन सर्वेक्षणासाठी ८४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे नर्सिंग महाविद्यालय व वसतिगृह उभारण्यासाठी २३ कोटी ६० लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नागरी दलितेतर योजनेतून रस्ते डांबरीकरणासाठीही सुमारे २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या सर्व विकासकामांमुळे मिरज मतदारसंघात पायाभूत सुविधांची मोठी उभारणी होणार असून नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.