विदर्भ

मार्च एंडिंगमुळे सुट्टीच्या दिवशीही जिल्हा परिषद गजबजली

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

आर्थिक वर्षाच्या अखेरीस अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने वाशिम जिल्हा परिषदेत ‘मार्च एंडिंग’चा ताण स्पष्टपणे जाणवू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही जिल्हा परिषदेचे सर्व विभाग अक्षरशः गजबजलेले दिसून आले. अधिकारी व कर्मचारी सुट्टीचा विचार बाजूला ठेवत कामकाजात व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

विकासकामांसाठी मंजूर झालेला निधी वेळेत खर्च करणे, प्रलंबित प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करणे आणि फाईल्सचा निपटारा करणे या कामांना वेग देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने धडक पावले उचलली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारीही कामकाज सुरू ठेवण्यात आले.

सामान्यतः शनिवार-रविवार या सुट्टीच्या दिवशी शासकीय कार्यालयांत शुकशुकाट असतो. मात्र, यावेळी चित्र पूर्णपणे उलट होते. विविध विभागांमध्ये अधिकारी-कर्मचारी सकाळपासूनच हजर राहून कामाचा निपटारा करताना दिसले. विकासकामांची देयके काढणे, निधी वितरणाची प्रक्रिया पूर्ण करणे आणि प्रलंबित फाईल्स निकाली काढणे या कामांना प्राधान्य देण्यात आले.

मार्च अखेर जवळ आल्याने निधी परत जाण्याची शक्यता टाळण्यासाठी प्रशासनाने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

एकूणच, “मार्च एंडिंग”च्या धावपळीत वाशिम जिल्हा परिषदेत सुट्टीचा विसर पडल्याचे चित्र असून, सर्व यंत्रणा विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी झटताना दिसत आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही