विदर्भसामाजिक

महामानवाच्या मिरवणुकीतून समतेचा संदेश गेला पाहिजे ; एपीआय जितेंद्र अडुळे

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त दि. ८ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता स्थानिक शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील भीमजयंती मिरवणूक मंडळ अध्यक्ष तसेच भीम अनुयायांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र अडुळे यांनी उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन केले. सदर बैठकीस नापोका अश्विन जाधव व पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर घुगे हे उपस्थित होते.

यावेळी जितेंद्र अडुळे म्हणाले की, महामानवांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणारी मिरवणूक ही केवळ उत्सवाची परंपरा नसून समाजाला दिशा देणारे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे या मिरवणुकीतून समता, बंधुभाव आणि सामाजिक एकतेचा ठोस संदेश गेला पाहिजे. महामानवांच्या विचारांचा गाभा हा समतेत असून, जाती-पाती, भेदभाव आणि अन्याय दूर सारत सर्वांनी एकत्र येणे हीच खरी जयंती साजरी करण्याची योग्य पद्धत आहे.

मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरिकाने शिस्त, संयम आणि जबाबदारीचे भान ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मिरवणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच, अफवांवर विश्वास ठेवू नये, भडकाऊ घोषणांपासून दूर राहावे आणि शांततेत व अनुशासनात मिरवणूक पार पाडावी, असेही त्यांनी सांगितले. मिरवणुकीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक विचार पोहोचवण्याची मोठी संधी असते. त्यामुळे केवळ ढोल-ताशा किंवा दिखाव्यापुरते न राहता, महामानवांच्या विचारांचे आचरण करणे आवश्यक आहे, असे अडुळे यांनी नमूद केले.

*“हेच खरे अभिवादन”*
महामानवांनी दिलेला समतेचा संदेश जनमानसात रुजवणे, सामाजिक सलोखा टिकवणे आणि एकजुटीने पुढे जाणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे शेवटी अडुळे यांनी सांगितले. समाजाने उत्सवाला जबाबदारीची जोड दिल्यासच खऱ्या अर्थाने परिवर्तन शक्य आहे, असा स्पष्ट संदेश या बैठकीतून देण्यात आला.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही