महाराष्ट्रसामाजिक

संविधान हाती, जिद्द छाती; पारधी तरुणाची पोलीस दलात भरती

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

भोसे (ता. मिरज) | समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या पारधी समाजातील एका तरुणाने जिद्द, शिक्षण आणि चिकाटीच्या जोरावर यशाची उंच भरारी घेत पोलीस दलात स्थान मिळवले आहे. भोसे येथील इंदर पवार याची सांगली पोलीस दलात झालेली भरती ही केवळ वैयक्तिक यशकथा नसून समाजपरिवर्तनाचा प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.

इंदर पवार यांचे वडील शंकर पवार आणि आई मंजुळा पवार यांनी पारंपरिक जीवनशैलीला फाटा देत शेतमजुरीचा मार्ग स्वीकारला. कष्ट करून कुटुंबाचे पुनर्वसन करत त्यांनी मुलांमध्ये बदलाचे आणि शिक्षणाचे महत्त्व रुजवले. याच विचारातून इंदरने बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आणि पोलीस दलात जाण्याचा ठाम निर्धार केला.

गेल्या पाच वर्षांपासून इंदरने धावणे आणि गोळाफेक या क्रीडा प्रकारांमध्ये सातत्य ठेवत कठोर परिश्रम केले. ग्रामीण भागातील मर्यादित साधनसामग्री असूनही त्याने हार न मानता सराव सुरू ठेवला. त्याच्या या चिकाटीमुळेच त्याला पोलीस भरतीत यश मिळाले.

डोंगरदऱ्यात भटकणारा आणि मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेला पारधी समाज वर्षानुवर्षे उपेक्षित राहिला आहे. मात्र आता या समाजातही बदलाची नवी लाट निर्माण होत आहे. सामाजिक कार्यकर्ते वैभव चव्हाण यांसारखे तरुण पुढे येत समाज परिवर्तनासाठी कार्यरत आहेत. इंदर पवारच्या यशामागे वैभव चव्हाण आणि शिंदे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सहकार्यामुळेच इंदरला योग्य दिशा मिळाली आणि त्याने आपले स्वप्न पूर्ण केले.

इंदरच्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या आनंदात सहभागी होत बोलवाडचे उपसरपंच सचिन दादा कांबळे यांनी इंदरच्या वस्तीवर जाऊन त्याचा सत्कार केला. यावेळी त्याला भारताचे संविधान भेट देण्यात आले. संविधानाच्या मूल्यांवर चालत समाजासाठी कार्य करण्याचा संदेश देत त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

इंदर पवारचे यश हे पारधी समाजासाठी आशेचा किरण ठरले असून, शिक्षण, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर कोणतीही अडचण पार करता येते, याचा तो जिवंत आदर्श ठरत आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही