नळ बसले, योजना फसली ; ग्रामस्थांची आशा खचली

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
मंगरुळपीर तालुक्यातील पेडगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेली पाणीपुरवठा योजना आज पूर्णपणे कोलमडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कागदोपत्री सर्व कामे पूर्ण दाखवली जात असली तरी प्रत्यक्षात गावकऱ्यांना एक थेंब पाणीही मिळत नसल्याने संतापाची लाट उसळली आहे.
गावात दोन विहिरी, दोन बोअरवेल, उंच पाण्याची टाकी आणि संपूर्ण गावभर पाइपलाइनचे जाळे उभारल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती पाहता ही सर्व यंत्रणा केवळ दिखावा ठरली आहे. पाण्याची टाकी ‘शोभेची वस्तू’ बनली असून नळ मात्र कोरडेच आहेत.
गेल्या १५ ते २० वर्षांपासून पाणीटंचाईशी झुंज देणाऱ्या पेडगावकरांना जलजीवन मिशनमुळे दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. पण ही योजना केवळ कागदावरच पूर्ण झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. गावात पाइपलाइन अर्धवट टाकलेली, काही ठिकाणी जोडणीच नसलेली, तर काही ठिकाणी कामेच अपूर्ण असल्याचे वास्तव ग्रामस्थांनी उघड केले आहे.
योजनेसाठी खर्च झालेल्या निधीचा हिशोब मागण्याची वेळ आता ग्रामस्थांवर आली आहे. कामे पूर्ण झाली कुठे? असा संतप्त सवाल गावकरी करत आहेत. कोट्यवधींच्या खर्चानंतरही गावाला पाणी मिळत नसेल, तर हा पैसा गेला कुठे? असा थेट प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, महिलांची मात्र सर्वाधिक परवड सुरू आहे. आजही त्यांना पाण्यासाठी लांब अंतरावरून पायपीट करावी लागत आहे. उन्हाळ्याच्या झळा वाढत असताना ही समस्या अधिकच तीव्र झाली आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच जण पाण्यासाठी हैराण झाले असून, प्रशासन मात्र ‘कानावर हात’ ठेवून बसल्याचे चित्र आहे.
ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी, खासदार व आमदार यांच्याकडे तक्रारी केल्या. मात्र त्या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप होत आहे. कामे पूर्ण झाल्याचे दाखवून शासनाची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.
आता पेडगावकरांचा संताप टोकाला पोहोचला असून, तात्काळ पाणीपुरवठा सुरू न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
एकीकडे जलजीवन मिशनसारख्या महत्त्वाकांक्षी योजनेची मोठमोठी जाहिरात केली जाते, तर दुसरीकडे पेडगावसारख्या गावात हीच योजना फसवी ठरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.