काँग्रेस पक्षाने तिकीट न दिल्यास वेगळा विचार केला जाईल ; बौद्ध समाजाचा इशारा

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. तसेच इच्छुकांनी गाठी भेटी, बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. अशातच मिरज विधानसभा मतदारसंघाची देखील जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मिरजेची ही जागा काँग्रेस पक्षाने बौद्ध समाजाला सोडावी, अशी मागणी केली जातेय. मिरज मतदार संघातून बौद्ध समाजाचे उमेदवार सी.आर.सांगलीकर यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी संपूर्ण बौद्ध समाजाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली आहे.
मिरज मतदार संघ गेल्या पंधरा वर्षापासून अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. मिरज मतदारसंघात 45,000 इतकी बौद्ध मतदारांची संख्या आहे. तरीपण बौद्ध समाजाच्या व्यक्तीला प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही. त्यामुळे बौद्ध समाजाचे संभाव्य उमेदवार सी. आर. सांगलीकर यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी द्यावी, याप्रकरणी संपूर्ण बौद्ध समाजाच्या वतीने खासदार विशाल पाटील, आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडे उमेदवारी देण्याचे मागणी करण्यात येणार आहे.
बौद्ध समाजाच्या उमेदवाराला काँग्रेस पक्षाने तिकीट न दिल्यास वेगळा विचार केला जाईल, असा इशारा बौद्ध समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. उद्योजक सी. आर. सांगलीकर यांना उमेदवारी दिल्यास संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेमध्ये मिरज मतदारसंघातील श्यामजी ढोबळे, अविनाश कांबळे, दिगंबर मोहिते, कावेस कांबळे, संजय कांबळे, रोहित कांबळे, अनिल कांबळे, रवी कांबळे, लोहा कांबळे, दीपक कारंडे, राहुल कांबळे,बाबासाहेब कांबळे आणि विक्रम चंदनशिवे आदी उपस्थित होते.