खटाव गावात चोरट्यांचा कहर ; एका रात्री तीन घरफोड्या, ग्रामस्थांत भितीचे सावट

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे
मिरज | खटाव गावात चोरट्यांनी कहर माजवत एका रात्रीत तीन ठिकाणी घरफोडी करून गावकऱ्यांना हादरवून सोडले. गावातील मल्लाप्पा पारोजे, अक्काताई कुमटे आणि कुसुम हुक्किरे यांच्या घरात चोरटे मध्यरात्री शिरले आणि रोकड व सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनांमुळे खटाव गावात प्रचंड खळबळ उडाली असून ग्रामस्थांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चोरीची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध, एपीआय तिप्पे, बीटमलदार शिंदे तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील इम्रान मुल्ला, संकेत मगदूम आणि इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तिन्ही घरांची पाहणी करून पंचनामा केला. मात्र, गावात सीसीटीव्ही कॅमेरेच नसल्याने तपासाला मोठा अडथळा निर्माण होत आहे.
ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करूनही सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले नाहीत, याबाबत ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सदस्य संजय कागवाडे हे मागील एक वर्षापासून या मागणीसाठी पाठपुरावा करत आहेत. चोरीच्या सलग घटनांमुळे आता ग्रामपंचायत प्रशासनावर तातडीने सीसीटीव्ही बसवण्याचा दबाव वाढला आहे.
सदर घटना ही खटाव गावातील पहिलीच अशी मोठी मालिका घरफोड्यांची ठरली आहे. एका रात्रीत तीन ठिकाणी चोरी झाल्याने पोलीस प्रशासनासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. चोरट्यांचा माग काढून त्यांना गजाआड करण्यासाठी पोलिसांची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे. ग्रामस्थांनी या घटनांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, “गावात सलग घरफोड्या होत असताना पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासन काय करत होते?” असा सवाल उपस्थित केला आहे.
गावकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने येत्या चार-पाच दिवसांत सर्व चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील, असे आश्वासन सरपंच रावसाहेब बेडगे यांनी दिले आहे. मात्र, ग्रामस्थांचा संताप एवढाच की, जर ही मागणी पूर्वी मान्य केली असती, तर कदाचित चोरटे आज तुरुंगात असते.
गावात झालेल्या सलग चोरींनंतर आता ग्रामस्थ सतर्क झाले आहेत. रात्रीच्या वेळी पहारा ठेवण्याबरोबरच पोलिसांनी चोरट्यांना गजाआड करण्यासाठी झटपट कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे.