महाराष्ट्रसामाजिक

दलित-वंचितांचा इतिहासातील सर्वात मोठा न्यायलढा यशस्वी ; माता रमाबाई नगर प्रकल्पाला गती देण्याचे सरकारचे मान्य

मुंबई | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे

घाटकोपर पूर्वच्या रमाबाई आंबेडकर नगरात दोन दशकांपासून रखडलेला ‘ओम साई गणेश’ गृहनिर्माण प्रकल्प म्हणजे भ्रष्टाचार, जातीय भेदभाव आणि प्रशासनाच्या उदासिनतेचे ज्वलंत प्रतीक बनला होता. १६,५७५ दलित-वंचित कुटुंबांचे स्वप्न शासनाच्या नोटिंगमध्येच अडकले होते. आश्वासने मिळाली, निवडणुका येऊन गेल्या, पण घरांचे भूते तरीही उभेच राहिले. सदर अन्यायाला अनिल मोरे, रवी नेटवते आणि विलास पवार या तीन लढवय्यांनी थेट आव्हान दिले.

न्याय मिळेपर्यंत उठायचे नाही या जाज्वल्य निर्धाराने हे तिघे आमरण उपोषणाला बसले आणि उपोषण सुरू होताच वातावरण अक्षरशः तापले. दलित-वंचितांच्या हक्काचा प्रश्न पुन्हा एकदा प्रखरपणे पुढे आला. उपोषणस्थळी सामान्य नागरिक, बौद्ध विकास सेवा संघाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, सल्लागार, महिला आणि युवकांनी लोंढ्याचे लोंढे दाखल होत संपूर्ण परिसरात आंदोलकांना साथ दिली. हा केवळ तीन व्यक्तींचा उपक्रम नव्हता ही होती १६,५७५ कुटुंबांची तळमळ, आक्रोश आणि न्यायाची आर्त हाक.

उपोषणाचा जोर वाढताच शेवटी प्रशासनाला हलावे लागले. मुद्दा थेट सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षद्वीप कांबळे यांच्या दालनात पोहोचला. दोन दशकांपासून ज्या फाईली धुळ खात होत्या, त्यांना अचानक गती मिळाली. सरकारी यंत्रणा एवढी दबावाखाली आली की पाच दिवसांत सर्व मागण्या मान्य करण्याची घोषणा करावी लागली. “न्याय मिळाला,” असे जाहीर करताच उपोषणस्थळी जल्लोष, डोळ्यांत पाणी आणि घोषणांनी वातावरण दणाणून गेले.

या उपोषणाने रखडलेल्या प्रकल्पातील भ्रष्टाचाराला उघडे पाडले तसेच प्रशासनाच्या संवेदनशून्यतेला चपराक मारली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले की, आता उच्चस्तरीय बैठक होणार असून सर्व १६,५७५ कुटुंबांना त्यांच्या हक्काची घरे देण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू होणार आहे. हे आंदोलन फक्त घरांसाठी नव्हते. हे आंदोलन होतं बाबासाहेबांच्या सामाजिक न्यायाच्या स्वप्नाला सत्यात उतरवण्याचे.

मोरे, नेटवते आणि पवार या तिघांनी उपोषणाला साथ देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार मानले. पण त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली. हा लढा आमच्यासाठी नाही तर हा लढा त्या प्रत्येक कुटुंबासाठी आहे. ज्यांनी दोन दशकं प्रशासनाच्या दारात साद घालूनही न्याय मिळवू शकला नाही.

रमाबाई नगरातील या उपोषणाने भ्रष्ट साखळीतील तडे पाडले आहेत. लोकांच्या आवाजात पुन्हा एकदा ज्वलनशील ताकद आहे. आणि आता या १६,५७५ कुटुंबांच्या घरांच्या दिशेने जाणारा मार्ग उजळू लागला आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही