महाराष्ट्रसामाजिक

सलगरेत चार कोटींच्या आरोग्य केंद्राचे लोकार्पण

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे

मिरज | सलगरे येथे तब्बल चार कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नव्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भव्य इमारतीचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (दि. २६ डिसेंबर) सकाळी १० वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. अनेक वर्षांपासून काम पूर्ण होऊनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले हे आरोग्य केंद्र तात्काळ रुग्णांच्या सेवेत यावे, या उद्देशाने हा सोहळा आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमास मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश भाऊ खाडे प्रमुख उपस्थित होते, तर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. सलगरे येथील हे प्राथमिक आरोग्य केंद्र मिरज पूर्व भागातील ऑक्सिजन बेडची सुविधा असलेले केंद्र ठरणार असून परिसरातील तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हे आरोग्य केंद्र महत्त्वाचा आधार ठरणार आहे.

यावेळी बोलताना आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी सांगितले की, प्रत्येक गावासाठी निधी देताना कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी सुसज्ज व स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारण्यात आली आहेत. कोट्यवधी रुपयांचा निधी थेट जनतेच्या आरोग्यासाठी खर्च करण्यात आला असून भविष्यातही आरोग्य सुविधांना प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी कधीही पक्षीय भेदभाव न करता कामे केली आहेत. अनेक कामे घेऊन गेल्यानंतर त्यांनी ती तात्काळ मार्गी लावल्याची अनेक उदाहरणे असल्याचे त्यांनी सांगितले. मदन भाऊंच्या पश्चात तानाजी पाटील यांना पोरक वाटत होते, आता तुम्ही त्यांना सांभाळून घ्या, असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले.

यानंतर बोलताना तानाजी पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की, याआधीच आम्ही सुरेश भाऊ खाडे यांच्यासोबत आलो असतो, तर अनेक विकासकामांचे नुकसान टळले असते. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी मोठा संघर्ष करावा लागला असून योग्य वेळी योग्य साथ मिळाली असती, तर ही सुविधा गावाला आधीच मिळाली असती. भविष्यात आपण कायम आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या सोबत राहणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

या लोकार्पण सोहळ्यास तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी अतुल वाठारकर, खंडेराजुरी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय शेटे, सलगरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ओंकार नानावरे, वैद्यकीय अधिकारी अमोल चव्हाण, सलगरेच्या सरपंच जयश्रीताई पाटील, उपसरपंच रमेश चाळके, ज्येष्ठ नेते खंडेराव जगताप यांच्यासह परिसरातील नेतेमंडळी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर आयोजित वनभोजनास उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही