जबरी चोरी व मंदिरातील दानपेटी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई ; सायबर सेलची मोलाची साथ

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
जिल्ह्यातील गुन्हेगारीवर पोलिसांनी कडक मोहीम उघडली असून, जबरी चोरी व मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्या दोन चोरट्यांना अखेर बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा वाशिमने सापळा रचून या आरोपींना पारडी आसरा फाटा परिसरातून जेरबंद केले.
फिर्यादीस मारहाण करून मोबाईल जबरीने पळवला
अनसिंग पोलीस ठाणे हद्दीतील खडसिंग पुलाजवळ ४ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी ज्ञानेश्वर बाबाराव बांडगे (रा. लाखी, ता. पुसद, जि. यवतमाळ) यांना थांबवून पैशाची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यावर चोरट्यांनी मारहाण करून त्यांच्या जवळील मोबाईल जबरीने चोरला. याप्रकरणी अनसिंग पोलीस ठाण्यात कलम ३९२ भा.दं.सं. अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
सायबर सेलच्या मदतीने आरोपींचा शोध
गुन्ह्याच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखा वाशिमने आपली गुप्त यंत्रणा सक्रिय केली. सायबर सेलच्या मदतीने आरोपी रमेश संतोष वाणी (२३) व अभिषेक कैलास वानखेडे (१९, दोन्ही रा. पारडी आसरा) हे पारडी आसरा फाट्याजवळ आढळून आले. पोलिस पाहताच आरोपी पळण्याच्या तयारीत होते. मात्र, पोलिसांनी शिताफीने सापळा रचत दोन्ही आरोपींना पकडले.
इतर ठिकाणी चोरीची कबुली
दोन्ही आरोपींना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी केवळ अनसिंगच नव्हे, तर जऊळका व मंगरुळपीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींच्या कबुलीनंतर पोलिसांनी चोरीला गेलेला मोबाईल जप्त केला असून, पुढील पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
पोलिसांची प्रशंसनीय मोहीम
या धडाकेबाज कारवाईचे मार्गदर्शन मा. पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. या मोहिमेत पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, अमर चौरे, उपनिरीक्षक शेखर मास्कर, कविता नागरे, बुध्दु रेघीवाले, महेश वानखेडे, राजकुमार यादव, अविनाश वाढे, तुषार ठाकरे, भुषण ठाकरे, शुभम चौधरी, गोपाल चौधरी, फ. परसुवाले, अजय जायभाय, चालक सुनिल तायडे, किशोर इंगोले व सायबर सेलची टीम सहभागी होती.
नागरिकांत कौतुक
जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटनांवर पोलिसांनी टाकलेला अंमलदारांचा विळखा कौतुकास्पद ठरत असून, नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास वाढला आहे. आरोपींवर कठोर शिक्षा व्हावी यासाठी पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनी कविता नागरे, पोलीस स्टेशन अनसिंग करीत आहेत.