सांगलीत छुप्या पद्धतीने मिळतो गुटखा ; आरोग्यास हानिकारक पदार्थांपासून तरूणाईची होणार का? सुटका

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मिरज/कुपवाड प्रतिनिधी | राजू कदम
महाराष्ट्रात गुटखा, सुगंधी तंबाखू सारख्या आरोग्यास हानिकारक पदार्थांच्या विक्री बंदी असली तरी सांगली शहरासह जिल्ह्यात गुटखाबंदी झाल्यानंतर सुरुवातीला काही काळ गुटखा उत्पादक धास्तावले होते. मात्र, पोलिसांच्या कारवायां होऊनही गुटखा उत्पादक, विक्रेत्यांनी समांतर व्यवस्था उभी करून बेकायदा गुटखाविक्रीचे जाळे निर्माण केले. गुजरात आणि कर्नाटक भागातील उत्पादकाकडून येणारा अवैध गुटखा जिल्ह्यात सर्रास विक्रेत्यांकडे येत आहे, हप्तेखोरी, पोखरलेल्या यंत्रणेमुळे सांगलीत गुटखा विक्री राजरोसपणे सुरू आहे.
राज्य शासनाने गुटखाविक्रीवर बंदी घातली असली, तरी या बंदीच्या आदेशाची पायमल्ली करून सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुटख्याची सर्रास विक्री होताना दिसत आहे. सांगली पोलिसांनी गुटखा तस्करी करणाऱ्या 32 जणांना अटक करून तब्बल पावणेतीन कोटी रुपये किंमतीचा वेगवेगळ्या प्रकारचा गुटख्यांचा साठा जप्त केला तरी पानाच्या दुकानांमधून (टपऱ्या) तसेच किराणा दुकानातून मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचा गुटखा विकला जात आहे. पोलीस तसेच अन्न व औषध विभागाची मेहेरनजर या व्यावसायिकांवर आहे, त्यामुळेच बेकायदा विक्री फोफावत चालली आहे का? असा ही प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सहजपणे कुठेही गुटखा उपलब्ध होत आहे. यात गुटखा विक्रेत्यांची चांदी होत असली तरी तरुणवर्ग मात्र व्यसनाच्या आहारी जात आहे.
तरुणांमध्ये या व्यसनाचे प्रमाण वाढत असून डोळेझाक करणारी सरकारी यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे या पदार्थांची सर्रास खरेदी-विक्री होत आहे. राज्यात गुटखा उत्पादनाला बंदी असल्याने शेजारील राज्यातू गुटख्याची तस्करी जोमाने सुरू आहे. परराज्यातून खुष्कीच्या मार्गाने गुटखा, सुगंधी तंबाखूची वाहतूक होत असल्याचे पोलिसांच्या कारवाईवरून दिसून येते. तस्करी करून जिल्ह्यात आलेल्या गुटखा, सुगंधी तंबाखूचा विक्रीची दरवर्षीची उलाढाल कोट्यावधीच्या घरात असल्याचे बोलले जाते.
राज्यात गुटखा उत्पादनावर बंदी आहे. त्यामुळे अनेक गुटखा उत्पादकानी जिल्ह्याच्या सीमेलगतच कर्नाटक हद्दीत गुटखा उत्पादनाचे कारखाने उभारले आहेत. तेथूनच गुटख्याचे मोठे तस्करी होते. जिल्ह्यासह शहरात गुटख्याचे वाहतूक करण्यासाठी गुन्हेगारांची मोठी साखळी कार्यरत आहे. त्यातून गुटखा जिल्ह्यात ही साखळी मोडून काढण्याची गरज आहे. कर्नाटकासह आंध्र प्रदेशात गुटक्याची तस्करी केली जात असल्याचे समजते.
सांगली जिल्ह्यात छुप्या मार्गाने गुटखा आणला जातो त्याशिवाय पुणे, अहमदनगर जिल्ह्यात ही सांगली जिल्ह्याच्या हद्दीतून गुटख्याचे वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. विशेषत: विजापूर परिसरातून गुटख्याची होती वाहनातून जत मार्गे पुणे, नगर कडे नेण्यात येत असल्याचे सिद्ध झाले आहे.
कंटेनर, टेम्पो, ट्रक अशा मोठ्या वाहनातून कर्नाटकातून गुटखा वाहतूक केले जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून उघड झाले आहे. याशिवाय काही तस्करांकडून आलिशान गाड्यांच्या वापर गुटखा वाहतुकीसाठी केला जातो. जत तालुक्यात नुकताच पकडलेला गुटखा ट्रक मधून नेण्यात येत होता. मोठ्या वाहनांची तपासणी फारशी होत नसल्याचाच गैरफायदा तस्करी करणारे घेत आहेत.