दलित कार्यकर्त्याचा खून, पुतण्याचा प्रतिहल्ला ; दोघे ठार

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
सांगली शहरातील गारपीर परिसर मंगळवारी मध्यरात्रीनंतर रक्तरंजित हल्ल्याने हादरला. दलित महासंघाचे कार्यकर्ते उत्तम मोहिते यांच्यावर शाहरुख शेख या तरुणाने तलवारीसारख्या धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला चढवला. हल्ला इतका भीषण होता की मोहिते यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतापलेल्या मोहिते यांच्या पुतण्याने शेखवर प्रतिहल्ला करत त्यालाही ठार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
प्राथमिक तपासानुसार, मोहिते आणि शेख यांच्यातील जुन्या वैमनस्यातून ही दुहेरी हत्या घडली असल्याचे समोर आले आहे. मात्र, ही सुपारी किलिंग होती का किंवा इतर कोणते कारण यामागे दडले आहे का, याचा सखोल तपास सांगली पोलीस करत आहेत. या प्रकरणात किमान चार जणांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
घटनेनंतर सांगली शहर पोलीस दलाची संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गारपीर परिसरात मोठ्या संख्येने बंदोबस्त तैनात केला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले असून सांगली शहरात चर्चेचा विषय ठरलेली ही दुहेरी हत्या रात्रीच्या शांततेला रक्तरंजित करून गेली आहे.