मालेगाव पोलिसांचा तलवारीवर घाव ; अवैध शस्त्रधारी गजाआड

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पोलीसांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करत अवैध शस्त्र बाळगणाऱ्या तरुणाचा खेळखंडोबा केला आहे. ३० आॅगस्ट रोजी दुपारी सिटी पॅलेस परिसरात ही कारवाई करण्यात आली.
गांधीनगर, मालेगाव येथील रितेश गजानन इंगळे हा तरुण अवैधरित्या लोखंडी पात्याची तलवार घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तत्परतेने सापळा रचत इंगळेला जेरबंद केले. तपासादरम्यान त्याच्याकडे तलवार आढळून आली. अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत त्याला गजाआड करण्यात आले.
या कारवाईत पिएसआय रवि सैबेवार, हेड कॉन्स्टेबल सुनिल पवार, हेड कॉन्स्टेबल शिवाजी काळे, पोलीस नाईक जितु पाटील, पोलीस नाईक अमोल पवार तसेच सैनिक गणेश तागड व महादेव मुठाळ यांनी सक्रिय सहभाग घेतला. संघटित कारवाई, पोलिसांची चपळाई आणि धाडस यामुळे पुन्हा एकदा गुन्हेगारी प्रवृत्तीला इशारा मिळाला आहे.
मालेगाव पोलिसांकडून वेळोवेळी अशा धडाकेबाज मोहिमा राबवल्या जात असल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होत आहे. अवैध शस्त्रसाठा व त्यातून उभ्या राहणाऱ्या गुन्हेगारीला कात्री लावण्याची ताकद मालेगाव पोलिसांनी दाखवून दिली आहे. नागरिकांमध्ये या कारवाईबद्दल समाधान व्यक्त होत असून, पोलिसांच्या कडक अॅक्शनमुळे गुन्हेगारीवर आळा बसणार असल्याचा विश्वास जनतेत निर्माण झाला आहे.